वाशीत वचनपूर्ती मेळावा
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई महापालिका आणि परिवहन उपक्रमातील कंत्राटी कामगारांना 7 हजार 500 रुपयांचा विशेष सानुग्रह लाभ आणि दिवाळीनिमित्त सरसकट 45 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर श्रमिक सेनेच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात भव्य वचनपूर्ती कामगार मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी कामगारांच्या वतीने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. नागरिकांवर करवाढीचा बोजा न टाकता कामगारांना चांगले वेतन आणि जनतेला दर्जेदार नागरी सुविधा देण्याची भूमिका कायम राहील. पुढील 20 वर्षे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ होऊ देणार नाही, अशी ग्वाही गणेश नाईक यांनी दिली.
श्रमिक सेना युनियनचे अध्यक्ष डॉ. संजीव नाईक, उपाध्यक्ष संदीप नाईक, महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृहनेते सागर नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, सरचिटणीस चरण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. संजीव नाईक यांनी कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले. देशातील एकमेव नवी मुंबई महापालिकेने कंत्राटी कामगारांच्या वेतनात केलेली वाढ विशेष उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांनी गणेश नाईक यांचे आभार मानले. महापौर सुजाता पाटील यांनीही हा निर्णय कामगारांच्या स्वप्नांची पूर्तता करणारा असून, त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार देणारा असल्याचे सांगितले. 45 हजारांच्या सानुग्रह अनुदानामुळे कामगारांसाठी आजपासूनच दिवाळी सुरू झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गणेश नाईक यांनी यावेळी महिलांना मोफत प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत परिवहन प्रवासाच्या सुविधेचाही उल्लेख केला. नवी मुंबईत पाणीकपात होऊ देणार नाही. पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्याबरोबरच बांधकाम व औद्योगिक क्षेत्रासाठी पर्यायी पाण्याचा वापर करण्यावर भर देण्यात येईल, असेही नाईक यांनी सांगितले.






