| बोर्ली पंचतन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन-शेखाडीमार्गे दिघीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील दिवेआगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे दोन्ही सांधे खचल्याने रस्त्यावर मोठ्या खाचा पडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांसाठी हा पूल धोकादायक ठरत असून, गंभीर अपघाताची भीती व्यक्त होत आहे. वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक खाचांचा अंदाज येत नसल्याने वाहने जोरात आदळत आहेत.
गेल्या दोन ते तीन दिवसांत रात्रीच्या वेळी खचलेले सांधे न दिसल्याने काही दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याची माहिती आहे. नवीन पुलाची अल्पावधीतच दुरवस्था झाल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणीही वाहनचालकांकडून होत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुणे, मुंबईसह विविध भागांतून दिवेआगरला मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. अशा वेळी पुलावरील धोकादायक खाचा मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून संबंधित ठेकेदाराकडून पुलाच्या दोन्ही सांध्यांची दर्जेदार दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. संबंधित विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.






