मोहर, फळधारणेवर परिणाम होण्याची भीती; बागायतदारांची चिंता वाढली
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
तालुक्यात आधीच दुष्काळी परिस्थिती झालेली असताना आता ढगाळ हवामान आणि पावसाच्या रिपरिपीमुळे आंबा बागायतदारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. आंब्याचा पालवी व मोहर फुटण्याचा महत्त्वाचा हंगाम सुरू असतानाच बदलत्या हवामानामुळे मोहर प्रक्रिया आणि आगामी फळधारणेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर हा आंबा झाडांना नैसर्गिक ताण मिळण्याचा आणि थंडीची चाहूल लागण्याचा काळ असतो. चांगल्या मोहरासाठी हे वातावरण पोषक मानले जाते. मात्र, सध्याच्या ढगाळ आणि दमट हवामानामुळे भुरी, करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच तुडतुडे किडीचा हल्ला होऊन कोवळी पालवी आणि मोहर सुकण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सततच्या ढगाळ वातावरणामुळे परागीभवन प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. परिणामी, मोहर गळणे आणि फळधारणा कमी होण्याची शक्यता आहे. दुष्काळामुळे जमिनीतील ओलावा कमी असताना हवामानातील या बदलांचा झाडांच्या नैसर्गिक चक्रावरही परिणाम होऊ शकतो. तालुका कृषी अधिकारी श्रध्दा डुंबरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे.
पेंढ्याच्या टंचाईमुळे आंबा पॅकिंगचा खर्च वाढणार
दुष्काळाचा परिणाम आंबा पॅकिंग व्यवस्थेवरही होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी यंदा भात उत्पादन घटण्याचा अंदाज असल्याने आंबा पॅकिंगसाठी लागणारा पेंढा कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे.त्यामुळे पेंढ्याची टंचाई निर्माण होऊन पर्यायी साहित्याचा वापर करावा लागेल. परिणामी पॅकिंगचा खर्च वाढून आंबा बागायतदारांच्या अडचणीत भर पडणार आहे.
सध्या आंब्याला पालवी आणि मोहर फुटण्याचा महत्त्वाचा काळ आहे. मात्र, ढगाळ वातावरण आणि पावसाच्या रिपरिपीमुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याचा मोहर आणि पुढील फळधारणेवर परिणाम होऊ शकतो.आधीच दुष्काळाचा सामना करत असताना हवामानातील या बदलांमुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे.
वैभव कर्णेकर,
आंबा बागायतदार, श्रीवर्धन






