12 दिवसानंतरही साखळी उपोषण सुरु

अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा
| उरण | प्रतिनिधी |
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पातील होणाऱ्या तेलगळीतबाबत ठोस उपाय योजना करावी, तसेच बाधीतांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थांनिकांची आहे. याप्रश्नी ते गेल्या 12 दिवसांपासून साखळी उपोषणला बसले आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपनी विरोधात आता बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याची माहिती वैभव कडू यांनी दिली.

8 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीच्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात तेल गळती झाली होती. सदर तेल गळतीमुळे नागांव, केगाव, दांडा, खारखंड आणि करंजा या गावाजवळील क्षेत्रात मच्छिमार, शेतकरी यांचे आर्थिक नुकसान झाले होते. सदर नुकसानीची आर्थिक मदत मिळणे आणि ओएनजीसी प्रकल्प मधून होणाऱ्या तेल गळती बाबत उपाययोजना करण्यासाठी आढावा बैठक घेण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाकडे केली होती.

तहसिलदार यांच्या दालनात 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी, प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांसह शेतकऱ्यांनी आपली व्यथा, समस्या तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे मांडली. नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी देखील करण्यात आली होती. या बैठकीत तहसीलदार उद्धव कदम यांनी शेतकरी व प्रकल्पग्रस्तांची बाजू ऐकून आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे सांगितले. मात्र नुकसान भरपाई संदर्भात ठोस असे आश्वासन अथवा कार्यवाही होत नसल्याने शेतकरी संतापले. त्यांनी सुरु केलेली साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

यावेळी सुरवातीपासून शेतकरी व प्रकल्पग्रस्तांची बाजू घेउन शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेले वैभव कडू यांनी शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी वेळोवेळी आवाज उठविला. शासनाच्या प्रत्येक विभागात पत्रव्यवहार केला. मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही. तहसील कार्यालयात सुद्धा मिटिंग झाली. त्यातही नुकसान भरपाई संदर्भात योग्य ते निर्णय झाले नाही. आणि जे निर्णय झाले ते प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांना मान्य नाहीत. त्यामुळे ओएनजीसी बाधित शेतकरी, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर ओएनजीसी प्रशासनाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांनी ओएनजीसी प्रशासनाला दिला आहे.

Exit mobile version