स्थानिकांना काम मिळविण्यासाठी लॉरी चालक मालक संघटना आक्रमक
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील करंजा गावाच्या हद्दीमधील ‘करंजा इन्फ्रा’ कंपनीत स्थानिकांना काम मिळावे यासाठी पनवेल, उरण ‘लॉरी चालक मालक संघटना’ आक्रमक झाली आहे. मंगळवार, दि. 8 ऑक्टोबरपासून कंपनीच्या गेटवर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
करंजा इन्फ्रा कंपनीमधील ट्रान्सपोर्टचे काम ठेकेदार बाहेरील ट्रान्सपोर्टरकडून करून घेत असल्याने येथील स्थानिकांना काम मिळत नसल्याचा ठपका ठेवत, येथील पोर्टमधील कोळसा वाहतूक करण्याचे काम स्थानिक ट्रान्सपोर्टना मिळाले पाहिजे, अशी मागणी पनवेल, उरण तालुका लॉरी चालक मालक संघटनेनी केली होती. याबाबत कंपनी प्रशासनाबरोबर स्थानिक लॉरी चालक मालक संघटनेने वारंवार संपर्क साधून मालाची वाहतूक करण्याचे काम येथील स्थानिकांना मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, याला कंपनी प्रशासन जुमानत नाही. यामुळे पनवेल, उरण लॉरी चालक मालक संघटनेत संतापाची लाट पसरली आहे.
येथील लॉरी चालक मालक संघटनेला कंपनी प्रशासनाने सामावून घेण्याची मागणी लावून धरली. परंतु, न्याय मिळत नसल्याने मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून रोजी गेटसमोर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती पनवेल उरण लॉरी चालक मालक संघटनेकडून देण्यात आली आहे.







