आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा

प्रज्ञानंदची गुजराथीवर मात

। टोरंटो । वृत्तसंस्था ।

हिकारु नाकामुरा याच्यावर विजय मिळवणार्‍या विदित गुजराथीला आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील तिसर्‍या फेरीत भारताच्याच आर. प्रज्ञानंदकडून हार पत्करावी लागली. प्रज्ञानंदसह त्याची बहीण आर. वैशाली हिनेही महिला विभागात नूरग्यूल सॅलीमोवा हिला पराभूत केले. भाऊबहिणीने हा दिवस गाजवला.

डी. गुकेशकडून दुसर्‍या फेरीत प्रज्ञानंदचा पराभव झाला होता. त्यामुळे प्रज्ञानंदवर तिसर्‍या फेरीत दबाव होता. प्रज्ञानंद-गुजराथी यांच्यामधील लढतीत दोन्ही खेळाडूंकडून कडवा संघर्ष पाहायला मिळाला. काही चालीनंतर गुजराथीचे पारडे जड वाटू लागले; पण 45व्या चालीनंतर प्रज्ञानंदने विजयाला गवसणी घातली. गुजराथी याप्रसंगी म्हणाला, ङ्गङ्घपहिल्या अकरा चालींनंतर ही लढत ड्रॉ होईल असे वाटत होते. एवढं मात्र निश्‍चित सांगू शकेन की, मी चांगल्या पोझिशनमध्ये होतो. दरम्यान, प्रज्ञानंद याने म्हटले की, ”खेळाच्या सुरुवातीबाबत सांशक होतो; पण काळ्या मोहर्‍यांनी खेळण्यास मी आनंदी होतो.” दरम्यान, प्रज्ञानंद व गुजराती यांना प्रत्येकी 1.5 गुणांची कमाई करता आली आहे. प्रज्ञानंद चौथ्या व विदित पाचव्या स्थानावर विराजमान आहे.

गुकेश- इयानमध्ये ड्रॉ
डी. गुकेश याने दुसर्‍या फेरीत आर. प्रज्ञानंदवर विजय मिळवत मोठी झेप घेतली होती; पण तिसर्‍या फेरीच्या लढतीत त्याला इयान नेपोनियात्चि याचा बचाव भेदता आला नाही. गुकेश-इयान यांच्यामधील लढत ड्रॉ राहिली. तिसर्‍या फेरीअखेर पुरुषांच्या विभागात गुकेश, इयान व फॅबियानो कॅरुआना हे प्रत्येकी दोन गुणांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर विराजमान आहेत.
एकसारखी सुरुवात
आर. प्रज्ञानंद व आर. वैशाली या भाऊ-बहिणीची या स्पर्धेची सुरुवात एकसारखीच झाली. प्रज्ञानंदला पहिल्या फेरीत ड्रॉवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर दुसर्‍या फेरीत तो पराभूत झाला. अखेर तिसर्‍या फेरीत त्याने विजय मिळवला. वैशालीलाही ड्रॉ, पराभव व विजय असाच सामना करावा लागला. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत अनुक्रमे 1.5 गुणांची कमाई केली आहे.
Exit mobile version