| खोपोली | प्रतिनिधी |
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव काजुवाडीतील धाकटी जेजुरी दरवर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होत होता. गेल्या चार वर्षांपासून चंपाषष्ठी उत्सवाला खंड पडला होता. परंतु, यंदा काजुवाडीतील सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत मल्हारभक्त पांडुरंग बुवा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली चंपाषष्ठी उत्सव सुरू केला, त्यामुळे खंडोबा भक्तांना चंपाषष्ठी उत्सव पर्वणी ठरणार आहे.
गेल्या चार वर्षांपासून चंपाषष्ठी सोहळा होत नसल्यामुळे खंडोबा भक्त आणि काजुवाडीतील ग्रामस्थांची हिरमोड होत होता. यंदा सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत चंपाषष्ठी उत्सव सोहळा सुरू केला आहे. सोमवार, दि.2 नोव्हेंबर रोजी सकाळी खंडोबा देवाला अभिषेक पूजा घालून उत्सवाला प्रारंभ झाला. दररोज खंडोबाची आरती सकाळी 9 वा. व सायं. 7 वा होणार आहे. चंपाषष्ठीच्या शेवटच्या दिवशी शनिवार, दि. 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा. तळी भंडारा, दुपारी 12.30 वा. महाआरती, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, दुपारी 3 ते रा.10 वा. पालखी सोहळा (काजुवाडी, भाजी मार्केट, खालची खोपोली, मार्गे वरची खोपोली), रात्री 10 ते पहाटे 05 वा. खंडोबाचे जागरण गोंधळ असा कार्यक्रम होणार आहे.







