अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा

लव परदेशीची तक्षिल नागरवर मात

| पुणे | वार्ताहर |

इंटेंसिटी टेनिस अकादमी व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन (12वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात क्वालिफायर लव परदेशी याने दुसर्‍या मानांकित तक्षिल नागरचा 6-1, 4-6, 6-1 असा पराभव करून आपली सनसनाटी निकालाची मालिका कायम ठेवली.

खराडी कपिला रिसॉर्ट येथील इंटेंसिटी टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित आरव बेले याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या आदिनाथ कचरेचा 6-0, 6-2 असा सहज पराभव केला. सातव्या मानांकित लक्ष्य त्रिपाठीने शौर्य गडदेला 6-1, 6-3 असे पराभूत केले. तिसर्‍या मानांकित सोलापूरच्या यशवंतराजे पवारने सहाव्या मानांकित अद्वैत गुंडचा 5-7, 6-3, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

मुलींच्या गटात अव्वल मानांकित वैदेही शुक्लाने रिशीता यादवचे आव्हान 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले. दुसर्‍या मानांकित नक्षत्रा अय्यरने देविका पिंगेला 6-2, 6-0 असे नमविले. मनस्वी राठोडने चाहत ठाकूरचा 6-1, 6-3 असा तर, पाचव्या मानांकित जान्हवी सावंतने देवेशी पडियाचा 7-5, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या लढतीत दुसर्‍या मानांकित ख्याती मनीष व हर्षिका सिंग यांनी कायरा मानकर व स्वर्णिका ढमाले यांचा 6-0, 3-6, 11-9 असा पराभव करून आगेकूच केली.

Exit mobile version