| पुणे | वृत्तसंस्था |
डेक्कन एज्युकेशन सोसायटी व शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(16 वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात प्रज्ञेश शेळके, रोहन बजाज, सक्षम भन्साळी, दक्ष पाटील, नीव कोठारी यांनी तर, मुलींच्या गटात काव्या देशमुख, देवांशी प्रभुदेसाई, स्वरा जावळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसर्या फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित आराध्य म्हसदेने आदित्य योगीचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. (दि. 27) मानांकित खेळाडूवर विजय मिळवणार्या प्रज्ञेश शेळकेने नीव गोगियाचा 6-3, 6-4 असा पराभव केला. आठव्या मानांकित जय गायकवाडने आदित्य गायकवाडचा टायब्रेकमध्ये 6-0, 7-6(2) असा पराभव केला. सातव्या मानांकित दक्ष पाटीलने क्वालिफायर आर्यन किर्तनेचा 7-5, 6-1 असा तर, दुसर्या मानांकित सक्षम भन्साळीने शारव शर्माचा 6-0, 6-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मुलींच्या गटात अव्वल मानांकित स्वानिका रॉयने वैष्णवी नागोजीचे आव्हान 6-0, 6-2 असे संपुष्टात आणले. शर्मिष्ठा कोद्रेने रितू ग्यानचा टायब्रेकमध्ये 7-5, 7-6(5) असा पराभव केला. चौथ्या मानांकित मेहक कपूरने आरोही देशमुखला 6-2, 6-2 असे नमविले. दुसर्या मानांकित काव्या देशमुखने अहाना पाटीलचा 6-3, 6-0 असा पराभव करून आगेकूच केली. तिसर्या मानांकित देवांशी प्रभुदेसाईने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या रित्सा कोंडकरचा 6-0, 6-1 असा पराभव केला. वैष्णवी चौहानने परी हिंगलेचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला.