पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता
| मुंबई | प्रतिनिधी |
मान्सूनच्या माघारीचा प्रवास सध्या सुरू असून, पुढील चार दिवसांत राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे दसर्याच्या आनंदावर पावसाचे विरजन पडण्याची शक्यता आहे.
काहीशा अडथळ्यानंतर मान्सूनच्या माघारीला पुन्हा सुरूवात झाली आहे. पूर्वेकडे वाहणारे वारे सध्या सक्रीय झाले आहेत. त्यामुळे राज्यात आर्द्रता, किमान व कमाल तापमानात वाढ होत आहे. याचा परिणाम ऋतूचक्रावर होऊन पावसाचे ढग दाटून येऊ लागले आहेत. राज्याच्या अनेक भागात पाऊस होत आहे. पुढील चार दिवस म्हणजेच दि. 11 ते 16 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून, या भागात पुढील चार दिवस मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.