चक्रीवादळामुळे हलक्या पावसाची शक्यता

ढगाळ वातावरण कायम राहिल्यास आंब्याला धोका
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

असानी चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होऊन रायगड जिल्ह्यासह कोकण परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सधा या वातावरणाचा तितकासा धोका जाणवत नसला तरी जर हेच वातावरण कायम राहिले तर मात्र आंबा पिकावर किड रोगाचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रेय काळभोर यांनी दिली. दरम्यान, बदलेल्या हवामानामुळे हलकासा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पावसामुळे मात्र आंबा पिकाला धोका संभवण्याची शक्यता काळभोर यांनी व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे असानी चक्रीवादळ निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण पसरले आहे. या संदर्भात प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रेय काळभोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या वाल, पावटा, हरभरे सारखे कडधान्ये हे उत्पादनाला आले असल्याने त्यांच्यावर या वातावरणाचा काही परिणाम होणार नसल्याने त्यांना कोणताच धोका संभवत नाही. मात्र हे वातावरण कायम टिकून राहिले तर आंबा सारख्या पिकाला त्यापासून धोका संभवतो. ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर मोहराच्या फळधारणेतून किडरोगाचा प्रार्दुभाव होऊ शकतो. मात्र जर ऊन पडले तर मात्र हा धोका टळेल. ढगाळ वातावरणाचा धोका टाळण्यासाठी शेतकरी, बागायतदारांनी आंब्यावर योग्य ती फवारणी करण्याचा सल्लाही काळभोर यांनी दिला आहे. मात्र दुर्दैवाने अवकाळी पाऊस झाला तर आंब्याचे नुकसान होण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे या वातावरणाचा जिल्ह्यातील नारळ सुपारीवर तसेच उन्हाळी शेतीवर कसलाच परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version