सिंधुदुर्गात हलक्या पावसाची शक्यता


। सिधुदुर्ग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात येत्या आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. यामुळे आंबा काढणी दरम्यान काळजी घेण्याचा कृषी सल्ला येथील फळ संशोधन केंद्राने दिला आहे. हवामान पूर्वानुमानावर आधारित कृषी सल्ल्यात म्हटले आहे की, पुढील पाच दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल व किमान तापमानात काही अंशी घट होऊन ते अनुक्रमे 33 ते 36 व 24 ते 26 अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आर्द्रतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान दमट व अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्याकडून वर्तविला आहे.
दक्षिण कोकण व गोवा या हवामान उपविभागामध्ये 27 मार्च ते 2 एप्रिल या कालावधी दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण व गोवा या हवामान उपविभागामध्ये 27 मार्च ते 2 एप्रिल या कालावधी दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या कालावधी दरम्यान सरासरी कमाल व किमान तापमान अनुक्रमे 30.36 व 16.45 अंश सेल्सिअस एवढे असले, तरी यावर्षी या कालावधी दरम्यान ते अनुक्रमे 33.35 व 21.84 अंश सेल्सिअस एवढे असण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये 23 ते 27 मार्च या कालावधी दरम्यान हलक्या स्वरुपाच्या, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

Exit mobile version