पाकमध्ये खेळण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता

इस्लामाबादमधील भारत-पाक डेव्हिस करंडक सामना

। नवी दिल्ली। वार्ताहर।

भारतीय टेनिस संघ डेव्हिस करंडक सामन्यासाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यास केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता भारतीय टेनिस फेडरेशनने व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिड करंडक गट-1 मधील सामना इस्लामाबादमध्ये 3-4 फेब्रुवारी रोजी नियोजित आहे. या सामन्यासाठी आपला संघ पाकिस्तानमध्ये पाठवू शकतो का, असा विचारणा अखिल भारतीय टेनिस संघटनेने क्रीडा खात्याकडे केलेली आहे.

आम्हाला अजून लेखी स्वरुपात कोणतीही मान्यता मिळालेली नसली तरी लवकरच ती मिळेल. ही द्विपक्षीय मालिका किंवा स्पर्धा नाही. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनची आहे आणि अशा जागतिक स्पर्धांमध्ये हस्तक्षेप करण्याचे केंद्र सरकारे धोरण नाही, असे आम्हाला सांगण्यात आल्याचे भारतीय टेनिस संघटनेचे सरचिटणीस अनिल धुपकर यांनी सांगितले.

दरम्यान, भारताकडून आम्ही या डेव्हिस करंडक सामन्यात खेळण्याबाबत निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत, असे पाकिस्तान टेनिस फेडरेशनकडून सांगण्यात आले. भारतीय टेनिस संघटनेने आमच्याकडे 11 अधिकारी आणि 7 खेळाडूंच्या व्हिसाची यादी पाठवली आहे, तरीही त्यांच्या अंतिम होकाराची आम्ही वाट पहात आहोत, असे पाक टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष सलीम सैफुल्हा यांनी सांगितले. आमच्या सरकारकडून मान्यता मिळाली की आम्ही लगेचच तुम्हाला होकार कळवू, असेही भारतीय संघटनेकडून कळवले असल्याचे सैफुल्हा म्हणाले.

इस्लामबादमध्ये येण्यासाठी होकार कळवण्याची अंतिम मुदत आहे. त्याअगोदर भारतीय संघटनेकडून आम्हाला होकार कळवायला हवा. ही अंतिम मुदत पाळली नाही तर भारताने हा सामना सोडला असेल होईल आणि आम्हाला पूर्ण गुण बहाल केले जातील, असेही सैफुला यांनी सांगितले. भारतीय टेनिस संघ या अगोदर 1964 मध्ये पाकिस्तानमध्ये डेव्हिस करंडक सामना खेळण्यास गेला होता. अख्तर अली, प्रेमजित लाल आणि एसपी मिश्रा यांच्या भारतीय संघाने पाकिस्तानवर 4-0 अशी मात केली होती.

Exit mobile version