जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव सादर
| पेण | प्रतिनिधी |
चांदेपट्टी दरडप्रवण गावाची कथा आणि व्यथा खूपच वेदनादायी आणि तेथील जनतेच्या जिवाशी खेळणारी असल्याने या गावाच्या पुनर्वसनाच्या हालचाली वाढल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दिली. त्यामुळे गेली पाच वर्षे पावसाळी हंगामात जीव मुठीत धरून वावरणार्या गावकर्यांना दिलासा मिळणार आहे.
तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, मंडळ अधिकारी सुरेंद्र ठाकूर, तलाठी वैशाली बावा यांचे पथक गावात गेले. गावच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन आधरणे चांदेपट्टी गावच्या खालील बाजूस असलेल्या गावात 90 घरांचे पुनर्वसन करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने पाठविण्यात आला असल्याचे सांगितले.
पेण तालुक्यातील पूर्व बाजूकडील उंच डोंगर रांगांमधील महलमिरा डोंगरातील चांदेपट्टीलगतचे वरवणे गाव आणि पेण खोपोली रस्त्यावरील वाक्रुळ गावासमोर उंच डोंगर उभे आहेत. या ठिकाणी पायथ्याशी गावे असल्याने येथे दरड कोसळणे ही पावसाळी हंगामातील समस्या कायमची डोकेदुखी असते. सुरक्षेच्या दृष्टीने या कालावधीत येथील नागरिकांना स्थलांतरित केले जाते.
या गावांमध्ये चांदेपट्टी उंचावर असल्यामुळे पावसाळ्यात आपत्ती ओढावल्यास येथे मदतकार्य पोहोचेपर्यंत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला मोठ्या प्रमाणात अडथळे दूर करीत जावे लागते. अशा परिस्थितीत या गावाचे पुनर्वसन करावे यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. गेली दोन पावसाळे चांदेपट्टी गावातील ग्रामस्थांना आंबेघर येथील मराठा समाज हॉलमध्ये काही काळ वास्तव्य करावे लागले. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. कारण, हे आंबेघर येथे मराठा समाज हॉलमध्ये जरी वास्तव्याला आले तरी त्यांची घरे, गुरढोरे, पाळीव पक्षी व प्राणी गावाकडेच राहिल्याने त्यांच्याकडे लक्ष देणे शक्य होत नव्हते, म्हणून या ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे.
गतवर्षी सादर केलेला या गावच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावात अधिक भर टाकत नव्याने जिल्हाधिकारी, रायगड यांना प्रस्ताव पाठविला आहे. दीड किलोमीटर अंतरावर खालच्या बाजूला असलेल्या आधरणे गाव परिसरात सुरक्षित जागेवर चांदेपट्टी ग्रामस्थांचे पुनर्वसन होणार आहे. यासाठी लागणारे आर्थिक बजेट आणि नागरी सुविध याबाबत सविस्तर माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.
तानाजी शेजाळ, तहसीलदार






