चंद्रकांत लोखंडे यांचा सन्मान

| कोलाड | प्रतिनिधी |

बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचा 6 वा वर्धापन दिन व शेतकरी मार्गदर्शन मेळावा रविवारी (दि.18) रोहा येथील कन्या शाळेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आंबेवाडी येथील शेतकरी चंद्रकांत गणपत लोखंडे यांना प्रगतशील शेतकरी म्हणून प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. चंद्रकांत लोखंडे यांनी भात शेतीसोबत फळझाडे, कडधान्य, भाजीपाला तसेच दुबार पिकांचे यशस्वी उत्पादन करून आधुनिक फरसबाग मॉडेल तयार करून, सेंद्रिय विषमुक्त शेती पद्धतीचा अवलंब करत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेने त्यांना शेतकरी नेते महाराष्ट्र, मा. रघुनाथ दादा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय पाशिलकर, उपाध्यक्ष शिवाजी मुटके, कृषी अधिकारी रणजीत लवटे, रायगड जिल्हाध्यक्ष रघुनाथ कडू, दगडू बामुगडे, तुकाराम सानप, अनिल लाड तसेच जिल्हा महिला अध्यक्षा वर्षा जांभेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी तसेच नव्या पिढीला शेतीकडे आकर्षित करण्याचा संदेश देण्यात आला.

Exit mobile version