| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यात महिला महाविद्यालय तसेच वसतीगृह उभारणीसाठी मंजूर करण्यात आलेली जागा बदलली जावी, अशी मागणी श्रीवर्धन बजरंग दलातर्फे करण्यात आली आहे.
बारा वर्षापूर्वी एसएनडीटी महिला महाविद्यालय सुरू करण्यात आले. महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध नसल्याने गणेश आळी येथील शासकीय तंत्र शिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये सदरचे महाविद्यालय आजतागायत सुरू आहे. या महाविद्यालयासाठी व वसतिगृहासाठी श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन म्हसळे मार्गावरील वडघर पांगलोली गावाचे हद्दीतील जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र सदरची जागा महिला महाविद्यालय व महिला वसतिगृहासाठी अयोग्य असल्याचे बजरंग दल कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कारण या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची नागरीवस्ती नसून अतिशय सुनसान असा हा परिसर आहे. तसेच या ठिकाणी जंगल देखील मोठ्या प्रमाणात आहे. ज्या युवती या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातील त्यांच्या सुरक्षेची हमी कोणीही घेऊ शकणार नाही. किंबहुना त्या ठिकाणी ज्या युवती वसतिगृहात राहतील त्यांच्या देखील सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न बजरंग दलाने उपस्थित केला आहे.
राज्यात लव जिहाद सारखे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदरच्या महाविद्यालयाची प्रस्तावित जागा बदलून, सदरचे महाविद्यालय श्रीवर्धन शहरामध्ये किंवा शहराच्या अत्यंत जवळच्या जागेत प्रस्तावित करावे. अशी मागणी कुलगुरूंकडे बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे. जर विद्यापीठाच्या वतीने या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील बजरंग दल कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडतील. असा इशारा बजरंग दला तर्फे देण्यात आला आहे.