पाकमधील अराजक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आल्यानंतर जो हिंसाचार उसळला तो अभूतपूर्व आहे. पाकिस्तानात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी तिथे लष्कराचा वरचष्मा कायम असतो. लष्करप्रमुख ज्या रीतीचा असेल त्याप्रमाणे तो कारभारात कमीअधिक हस्तक्षेप करतो. जनरल झिया किंवा मुशर्रफ यांच्यासारखे लष्करप्रमुख सर्व देश आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. याउलट काही लष्करप्रमुख देशात लोकशाही निवडणुका व्हाव्यात यासाठी वातावरणनिर्मिती करतानाही दिसले आहेत. मात्र जनता व राजकीय पक्ष लष्करी शक्तीला आव्हान देतील अशी कल्पनाही तिथे केली जात नाही. असे आव्हान उभे राहू नये यासाठी लष्करही पुरेपूर दक्षता घेत असते. खान यांच्या अटकेनंतर जवळपास पहिल्यांदाच लष्कराविरुध्द लोकांनी खुलेपणाने संताप व्यक्त केला. खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या पाकिस्तान तेहरिके इन्साफ किंवा पीटीआय या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील लष्करी कार्यालयांमध्ये घुसून तोडफोड व जाळपोळ केली. कहर म्हणजे रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयातही ते घुसले. इस्लामाबाद, लाहोर इत्यादी ठिकाणच्या लष्करी कार्यालयांवर आणि अधिकार्‍यांच्या घरांवर हल्ले करण्यात आले. सरघोडा येथील अत्यंत मानाच्या अशा हवाई दलाच्या स्मारकाची नासधूस करण्यात आली. मुख्य म्हणजे इतके होऊनही लष्कराची प्रतिक्रिया संयत आहे. लष्कराची ताकद कितीतरी अधिक आहे. हां हां म्हणता ते या निदर्शकांना चिरडून टाकू शकतात. पण तसे घडलेले नाही. पाकिस्तानच्या इतिहासात हा दुर्मिळ प्रसंग आहे. इम्रान खान यांना पदावरून जावे लागल्यापासून लष्कर आणि त्यांच्यात संघर्ष चालू आहे. मध्यंतरी आपल्याला मारण्याचे तीन प्रयत्न झाले असे इम्रान खान यांचे म्हणणे आहे. हे हल्ले दिवसाढवळ्याच झाले होते. त्यामुळे त्यात थोडेफार तथ्य आहेच. पण हल्लेखोर नेमके कोण होते हे स्पष्ट झालेले नाही. इम्रान यांच्याविरुध्द शेकडो खटले दाखल आहेत. त्यात भ्रष्टाचारापासून ते गुन्हेगारी प्रकरणांपर्यंत अनेक प्रकार आहेत. मंगळवारी इस्लामाबाद येथील उच्च न्यायालयात एका खटल्यासाठी उपस्थित असतानाच इम्रान यांना लष्करी पोलिसांनी अटक केली. इम्रान हे जणू खतरनाक खुनी असावेत अशा रीतीने हजारो जवान त्यासाठी तैनात करण्यात आले होते. त्यांनी इम्रान यांना मानगूट धरून गाडीत कोंबले. हा सर्व प्रकार वाहिन्यांनी लाईव्ह प्रसारित केला. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे नॅशनल अकौंटॅबिलिटी ब्यूरोने ही कारवाई केली. दहा वर्षांपूर्वी, अण्णा हजारेंच्या कल्पनेतल्या लोकपालाला सर्वोच्च न्यायालयाच्याही वरताण अधिकार राहणार होते. सुदैवाने आपल्याकडे तो आला नाही. इम्रानना अटक करणारा ब्यूरो हा पाकिस्तानातील लोकपालच आहे. त्याला पोलीस व न्यायालयाचे सर्व अधिकार आहेत. लष्करी अधिकारी या ब्यूरोचे प्रमुख असतात. त्यामुळे हा मामला सरकार, पोलिस किंवा न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेरचा आहे. पण इम्रानची लोकप्रियता मोठी असल्याने दोन्ही बाजूंचा संघर्ष अटळ आहे. पाकिस्तान एका नव्या अराजकाकडे निघाला आहे. 

Exit mobile version