होळीनिमित्त विशेष गाड्यांची मागणी, खासगी वाहतूकदारांकडून जास्तीचे भाडे
। दिघी । प्रतिनिधी ।
दिघी एसटी कर्मचार्यांनी दिवळीपासून संपाचे हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जिल्ह्यातील बहुतांश स्थानकांमध्ये शुकशुकाट आहे. आता तर होळी उत्सव सात दिवसांवर येऊन ठेपला असताना श्रीवर्धन आगारातून एसटी बसच्या फक्त 3-4 फेर्या सुरू आहेत. लांब पल्ल्याच्या फेर्या पूर्ण बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी मात्र संपाचा फायदा उठवत अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची लूट सुरू केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शाळा पूर्वत सुरू झाल्याने विद्यार्थीही उत्सुक होते. श्रीवर्धन तालुक्यातील पाचवीनंतरच्या जवळपास सर्वच शाळा सुरू झाल्याने शिक्षण व्यवस्था रुळावर येत असतानाच एसटीच्या संपाचे ग्रहण लागले आहे. आता होळीसाठी गावाकडून मुंबई तसेच मुंबईहून गावी जाण्यासाठी एसटी वाहतूक परवडण्यासारखी व सुरक्षित असते त्यामुळे आबालवृद्धांपासून सर्वचजण एसटीला प्राधान्याने पसंती देतात. मात्र, सध्या विलनिकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचारी संपावर आहेत. याचा फायदा घेत खाजगी वाहतुकदारांनी तिकीट दरामध्ये वाढ सुरु केली आहे. त्याचा मोठा फटका हा एसटी महामंडळ व सामान्य प्रवाशांना बसत आहे.
श्रीवर्धन- बोर्लीपंचतनमधून मुंबई तसेच नालासोपारा जाण्यासाठी 400 ते 500 रुपये भाडे खाजगी वाहतुकदार घेत होते. होळी उत्सवात आणखी तिकीट दर वाढणार आहेत. यामुळे कोकणातील तमाम प्रवाशांचे होळीनिमित्त महामंडळाच्या विशेष गाड्यांकडे लक्ष लागले आहे.
होळीची अजून तयारी नाही
श्रीवर्धन बसस्थानकातून सध्या मुंबईसाठी तीन व पनवेल पर्यंत तीन बस सुरू आहेत. येत्या काही दिवसात आवश्यकतेनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आगारातील अधिकार्यांनी सांगितले.
एसटी कर्मचार्यांनी व सरकारने समन्वयाने एसटी वाहतूक पूर्वत करावी. प्रवाशांचे एसटी अभावी होत असलेले हाल व आर्थिक पिळवणूक ही गंभीर बाब आहे व तितकीच संताप आणणारी आहे.- सुनील रिकामे, मुंबईस्थित, नागलोली.
दरवर्षी महिनाभरआधी कोकणात जाण्यासाठी होळीनिमित्त विशेष गाड्यांची घोषणा करण्यात येते. यंदा होळीला जेमतेम आठवडा बाकी असतानाही या गाड्यांची घोषणा झाली नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे. – संदेश दिवेकर, प्रवासी.