मुंबई पोलीस, विश्वशांती, अमरहिंद यांची विजयी आगेकूच
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई पोलीस, विश्वशांती मंडळ, अमरहिंद मंडळ यांनी चंद्रोदय क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या महिला गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी आगेकूच केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रणसंग्राम रागीणींचा या अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रभादेवी येथील मुरारी घाग मार्गावरील स्व. दिनकर खाटपे क्रीडांगण सुरू असलेल्या सामन्यात मुंबई पोलिस संघाने धारावी महिला संघाला 38-08 असे सहज नमवित पुढची फेरी गाठली. सोनाली सुतार, करिष्मा म्हात्रे यांच्या चढाई-पकडीच्या झंजावाती खेळाने पोलीस संघाने विश्रांतीपर्यंत 17-04 अशी भक्कम आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर देखील त्याच त्वेषाने खेळ करीत हा विजय मिळविला. धारावीचा संघ दोन्ही डावात अवघे 4-4 गुण मिळवू शकला.
दुसर्या सामन्यात विश्वशांती क्रीडा मंडळाने ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाचा 42-16 असा पाडाव करीत आगेकूच केली. पूर्वार्धात उत्तम लढत देणार्या ओम ज्ञानदिपला उत्तरार्धात मात्र तो जोश राखणे जमले नाही. उत्तरार्धात विश्वशांतीच्या भारती यादव, विशाखा पाटील यांनी चढाई-पकडीचा नेत्रदीपक खेळ करीत सामना एकतर्फी आपल्याकडे झुकविला. ओम ज्ञानदीपची आचल यादव चमकली. शेवटच्या सामन्यात दादरच्या अमरहिंद मंडळाने सुकाईदेवी मंडळावर 47-14 अशी मात केली. श्रद्धा कदम या भारी भक्कम खेळाडूंच्या तुफानी चढाया त्याला दिव्या यादवची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे अमरहिंदने पहिल्या डावात 39-04 अशी मोठी आघाडी घेतली होती. दुसर्या डावात सावध खेळ करीत विजय आपल्या नावे केला. सुकाईदेवीची नेहा कदम बरी खेळली.