विप निवडणुकीत चुरस

कोकण- आठ रिंगणात; पाच जणांची माघार
नाशिक,नागपूरमध्ये लक्ष्यवेधी लढती

| मुंबई | प्रतिनिधी |
शिक्षक,पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. कोकण शिक्षक मतदार संघात आता आठजण रिंगणात उरले आहेत.खरी लढत शेकापचे बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांच्यातच होणार आहे.नाशिक,नागपूरमध्ये लक्ष्यवेधी लढती अपेक्षित आहेत. नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील विरुद्ध सुभाष जंगले अशी थेट लढत होणार आहे. इतरही अपक्ष उमेदवार असले तरी या दोन्ही उमेदवारांच्या कामगिरीकडे राज्याचे लक्ष असेल.

नागपूर शिक्षक मतदारसंघातही अनेक नाट्यमळ वळणे पाहायला मिळाली. नागपूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने गंगाधर नाकाडे यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला. नागपूरमध्ये भाजपचे वर्तमान आमदार नागो गाणार आणि काँग्रेसच्या सुधाकर आडबोले यांच्यात थेट लढत होईल. मात्र यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघात अमरावतीची जागा महाविकास आघाडीमधील काँग्रेसने मिळवली आहे. काँग्रेसकडून धीरज लिंगाडे आणि त्यांच्याविरोधात भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील अशी ही लढत असेल. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे. विद्यमान आमदार विक्रम काळे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपाने काँग्रेसमधून आयात केलेले किरण पाटील निवडणुकीत उतरवले आहेत. काळे यांनी याआधी दोन टर्म काम केल्यामुळे त्यांना ही निवडणूक तशी अवघड नाही.

सत्यजीत तांबे निलंबित
नाशिक पदवीधर मधून उमेदवारी अर्ज सादर करणारे सत्यजीत तांबे यांनाही काँग्रेसमधून निलंबित केले जाणार आहे.तसे आदेश केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश काँग्रेसा दिलेले आहेत.

Exit mobile version