नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अनेक दिवसांपासून बंद असलेली चारधाम यात्रा पुन्हा सुरू होण्याचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून, उद्यापासून (18 सप्टेंबर) ही यात्रा सुरू होणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
चारधाम यात्रेला दिलेली स्थगिती उठवतानाच, कोरोनाविषयक नियमांचे कठोर पालन करून ही यात्रा पार पाडावी, असे निर्देश उत्तराखंड उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिलेले आहेत. चारधाममधील मंदिरांना भेट देणार्या भाविकांच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा घालण्यासारख्या निर्बंधांसह ही यात्रा सुरू होईल, असे मुख्य न्यायाधीश आर.एस. चौहान व न्या. आलोक कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने यात्रेवरील बंदी उठवताना सांगितलेले आहे. कोव्हिड चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आणि लसीकरण प्रमाणपत्र यात्रेकरूंसाठी अनिवार्य राहील, असेही न्यायालय म्हटले आहे.