चरी शेतकरी संपाचा वर्धापन दिन उत्साहात

शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची उपस्थिती

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

सावकारी विरोधात चरी परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी संप पुकारला होता. शेतकऱ्यांनी दाखविलेली एकजूट आणि मिळविलेला विजय अत्यंत प्रेरणादायी ठरला. त्यामुळे कसेल, त्याची जमीन हा कायदा मंजूर झाला. नारायण नागू पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या संपाचा 92 वा वर्धापन दिन गुरुवारी (दि.27) चरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील स्तंभाला पुष्प अर्पण करून शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अभिवादन केले.


यावेळी चरी येथील माजी सरपंच निलम पाटील, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, नारायण जाधव, कृषी अधिकारी तथा चरी ग्रामपंचायत प्रशासक राजेश घरत, उरणचे सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील, पराग पाटील, माजी सरपंच विजय ठाकूर, ताडवागळेचे माजी सरपंच शैलेश पाटील आदी मान्यवरांसह शेतकरी, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोकणात चार शतकांपासून जमीन महसूलाची खोती पध्दत चालू होती. खोत, सावकारांच्या मगरमिठीत सापडलेला शेतकरी स्व. नारायण नागू पाटील व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जागा झाला. सावकारांविरोधात प्रदिर्घ वर्ष चरी या ठिकाणी शेतकऱ्यांचा संप चालला.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरात तब्बत सात वर्षे शेतकरी संपावर गेले होते. त्या काळातील खोतीपध्दती विरोधात शेतकऱ्यांनी लढा दिला होता. चरी या ठिकाणी शेतकऱ्यांनी परिषद भरवून लढ्याचे रणशिंग फुंकले होते. एक अभूतपूर्व आंदोलन करण्यात आले होते. परिसरातील 14 गावे या संपात सहभागी झाली होती. 1933 ते 1939 या सात वर्षाच्या कालखंडात हजारो शेतकऱ्यांनी अन्नाचा कण न पिकविता संप पुकारला होता. या संपामुळे कसेल त्याची जमीन हे नैसर्गिक न्याय तत्व अंमलात आणणारा कुळ कायदा मंजूर झाला. नारायण नागू पाटील यांच्या प्रभावशाली नेतृत्वाला अभिवादन देण्याबरोबरच संपातील शेतकऱ्यांच्या संघर्षमय स्मृतींना उजाळा देण्यासाठी चरी या ठिकाणी 92 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला स्मारकाला मानवंदना देण्यात आली. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते स्तंभाला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चरी पंचक्रोशीतील 14 शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 25 नोव्हेेंबरला वकृत्व, रांगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या 40 हून अधिक विद्यार्थ्यांचा 27 नोव्हेंबर रोजी चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना नारायण नागू पाटील यांच्या कार्याची माहिती देत शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी ग्रामपंचायतीकडून शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सुरेंद्र पाटील, पराग पाटील, अनंत थळे, विनायक पाटील, नारायण जाधव, मनोज थळे यांनी मेहनत घेतली.

शेतकऱ्यांचा संप मार्गदर्शक ठरणारा- चित्रलेखा पाटील
शेतकऱ्यांचे नेते स्व. नारायण नागू पाटील यांनी खोती विरोधात लढा पुकारला. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा लढा आजच्या पिढीला एक मार्गदर्शक ठरणार आहे. स्व. नारायण नागू पाटील यांचे कार्य मोलाचे आहे. त्यामुळे आज असंख्य शेतकरी सन्मानाने जगत आहेत. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार स्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेदेखील या महान लढ्यासाठी मोलाचे योगदान राहिले आहे. चरी येथे साजरा होणाऱ्या संपाला 92 वर्षे झाली आहेत. आजच्या पिढीपर्यंत महान नेत्यांचे कार्य पोहचविण्याची गरज आहे. या लढ्यामध्ये 14 गावांतील हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन हा संप यशस्वी करून दाखविला. त्यांचे कार्य कदाही न विसरण्यासारखे आहे. जगातील, देशातील सर्वात मोठा आणि प्रदिर्घ काळ चालणारा हा संप प्रत्येकाच्या स्मरणात राहणारा आहे, असे प्रतिपादन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
Exit mobile version