शार्लोट तलाव होणार गाळमुक्त

निधी दिल्यास जुलैमध्ये गाळ काढणार; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची माहिती

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरानमध्ये पाणी पुरवठ्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या शार्लोट लेकचे गेल्या दहा वर्षात गाळ काढण्याचे काम झाले नाही. लेकमधील गाळ काढण्यात यावा या मागणीसाठी माथेरानमधील निसर्ग पर्यटन संस्था उपोषण करणार असून तसा लेखी इशारा देण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून निसर्ग पर्यटन संस्था यांना जीवन प्राधिकरणाने पत्र देऊन जुलै महिन्यात शार्लोट लेकमधील गाळ काढला जाऊ शकतो. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास शार्लोट लेकमधील गाळ काढण्याची प्रक्रिया होणार आहे असे पत्रकात नमूद केले आहे.

माथेरान शहरात पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या शार्लोट लेकमधील पाण्याची साठवण क्षमता जंगलातील माती वाहून आल्याने कमी झाली आहे. 2013 मध्ये या तलावातील गाळ श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून 2000 श्री सदस्यांनी श्रमदान करून काढले होते. त्यानंतर एक तप पूर्ण झाले असून अनेक वर्षे शार्लोट लेकमधील गाळ काढल्याची मागणी होत आहे. त्यासाठी तलावावर सामाजिक कार्यकर्ते सांतोष कदम यांनी उपोषणदेखील केले होते. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि माथेरान नगरपरिषदेकडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे माथेरानमधील निसर्ग पर्यटन संस्थेने उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्र्र जीवन प्राधिकरणाला जाग आली. प्राधिकरणाकडून निसर्ग पर्यटन संस्थेच्या पत्रावर माथेरान शहरास माहे ऑक्टोबर ते जूनपर्यंत उल्हास नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येतो. पावसाळ्यामध्ये शार्लोट तलावातून पाणी पुरवठा करण्यात येतो. माथेरान शार्लोट तलावामध्ये अंदाजे 10 ते 15 फुट इतका गाळ असण्याची शक्यता आहे. सदर गाळ काढणे आवश्यक आहे असे त्यांनी मान्य केले आहे.

गाळ काढल्याने तलावाची क्षमता वाढू शकते. सदर तलाव माथेरान नगर परिषदेच्या मालकीचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अमृत-2 कार्यक्रमांतर्गत माथेरान नगरपरिषदेकडून शार्लोट तलाव सुशोभिकरण करणे या कामाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. या कामासाठी रु.499.82 लक्ष किंमतीच्या अंदाजपत्रकास अधीक्षक अभियंता, म.जी.प्रा. मंडळ पनवेल या कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता दि.06 फेब्रुवारी 2023 रोजीच्या पत्रान्वये देण्यात आली आहे. अंदाजपत्रकात तलावातील गाळ काढण्याचे व वाहतूक करुन टाकणे, तसेच सदर तलावातील गेट व ब्रीजची बाजू दुरुस्तीकरीताची तरतूद आहे. या कामास प्रशासकीय मंजूरी मिळाली असून माथेरान नगरपरिषदेस शासनाने राज्य सरोवर संवर्धन योजनेतंर्गत माथेरान येथील शार्लोट तलावास पर्यावरणदृष्ट्या संवर्धन व संरक्षण करण्यासाठी रु.362.65लक्ष इतक्या मंजूर निधीतील राज्य हिश्श्यापोटी रु.326.38 लक्ष इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मंजूर रक्कमेपैकी रु. 200.00लक्ष इतका निधी आतापर्यत वितरीत केला असून उर्वरित कामे करण्यासाठी रु.100.00 लक्ष इतका निधी नगरपरिषदेस उपलब्ध करून दिला आहे.

माथेरान नगरपरिषदेकडून गाळ काढण्याची कार्यवाही होणे अपेक्षित आहे. सद्य स्थितीत माथेरान शार्लोट तलावामध्ये 31.00 फूट इतकीपातळी असून माथेरान शहरासाठी कच्चे पाणी पिण्यासाठी शुद्ध करण्यासाठी उचलण्यात येते. सदर गाळ काढण्याचे काम आपण जुलै महिन्यात करू शकतो असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उप अभियंता अपर्ण कंटे यांनी निसर्ग पर्यटन संस्था माथेरान यांना पत्र देऊन कळविले आहे. त्यामुळे उपोषण करू नये अशी विनंती प्राधिकरणाकडून निसर्ग पर्यटन संस्थेच्या कार्यकर्त्यांना करण्यात आली आहे.

Exit mobile version