तलावातील गाळ काढण्यास सुरूवात
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानच्या शारलोट तलावाची एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळख आहे. मात्र हा तलाव माथेरानची जीवनवहिनी सुद्धा आहे. य ातील जलसाठा हा माथेरान मधील नागरिकांसह पर्यटकांना पिण्यासाठी वापरला जातो. पण गेली सात वर्षे या तलावातील गाळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काढून तो स्वच्छ केला नाही. त्यामुळे या तलावात पाणी कमी आणि गाळ जास्त अशी स्थिती झाली होती. एमजेपीने या तलावातील गाळ स्वच्छ करण्याबाबत एमजेपीने निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करत आपली उदासीनता दाखवत हात वर केले. परिणामी पाणी टंचाईच संकट माथेरानकरांवर ओढू नये यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेत या शारलोट तलावाची स्वच्छता सुरू केली आहे.
माथेरान हे गिरीशिखरावरील पर्यटनस्थळ असल्याने साहजिकच जोरदार पाऊस येथे पडतो. त्यामुळे सखल भागात हा तलाव असल्याने तीन दिशातून पाणी या तलावात येते. वाहते पाणी असल्यामुळे गाळ सुद्धा मोठ्या प्रमाणात येतो. पण हा गाळ गेली सात वर्षे काढला नसल्याने गाळाचे प्रमाण वाढले असून पाणी कमी साठत आहे. यासाठी हा गाळ काढणे अति महत्वाचे होते. नगरपालिकेने याचे गांभीर्य लक्षात घेऊन जोरदार पाऊस पडण्यागोदर तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे.
माथेरानमध्ये या तलावातील पाणी फिल्टर करून याचा पिण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे हा तलाव स्वच्छ करणे महत्वाचे आहे.य ाचा सारासार विचार करत नगरपालिकेतील माजी बांधकाम सभापती यांनी तलाव स्वच्छ करण्यासंदर्भात मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांना पत्र लिहून गाळ काढण्याची विनंती केली होती. तसेच नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व त्यांच्या सदस्यांनी यांनी ठराव ही पारित केला होता. 6 लाख 66 हजार 22 रुपये अंदाजपत्रकिय किंमत ही करून जुलै 21 मध्ये या कामाची तांत्रिक मान्यता ही आणली होती. त्यानुसार मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी निविदा प्रसिद्ध करून या कामाला सुरुवात देखील केली आहे. ठेकेदारामार्फत हे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि याच्यावर देखरेख स्वतः मुख्याधिकारी ठेवत आहेत.
शारलोट तलावाचे गाळ काढणे आणि स्वच्छता करणे हे काम नगरपालिकेने युद्धपातळीवर सुरू केले आहे. 1857 मध्ये बांधलेला शारलोट तलाव हा ब्रिटिशकालीन असून काही ठिकाणी फक्त दगडापासून बांधलेल्या भिंती पडल्या होत्या त्या भिंती बनविण्यात येत आहेत. तसेच तलावातील गाळ जास्त असल्याने ते काढण्याचे काम सुरू आहे. यावर मी स्वतः देखरेख ठेवत आहे. लवकरच जेसीबीला परवानगी मिळाली तर एक महिन्यात या तलावातील गाळ काढून स्वच्छ केला जाईल व काढलेला गाळ हा वृक्ष संवर्धनासाठी वापरला जाईल.
सुरेखा भणगे-शिंदे, मुख्याधिकारी तथा प्रशासक