| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. हे अधिवेशन 22 जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे. हा निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 10 जुलैपर्यंत चालणाऱ्या या तीन आठवड्यांच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या आणि ज्वलंत विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेचे कामकाज सकाळी 11.00 वाजता, तर विधान परिषदेचे कामकाज दुपारी 12.00 वाजता सुरू होणार आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या मान्यतेनंतर विधिमंडळ सचिवालयाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. या अधिवेशनात वाढती गुन्हेगारी, शेतकरी कर्जमाफी, मान्सूनपूर्व कामांमधील त्रुटी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, खत व बियाण्यांचा तुटवडा यांसारख्या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. याशिवाय, नोकऱ्यांमधील समांतर आरक्षण रद्द करण्याच्या हालचाली आणि अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा मुद्दाही अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत.







