पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू
| सोलापूर | प्रतिनिधी |
सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ एका भीषण अपघाताची घटना आहे. देवदर्शनावरून परतताना पिकअप वाहन विहिरीत कोसळून 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, 7 जण बचावले आहेत. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप वाहन विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. त्यात पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील 8 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर, 7 जण बचावले आहेत. हे सर्वजण सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक हा अपघात झाला आहे. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ही विहीर रस्त्याच्या कडेला होती. भाविकांसह पिकअप वाहन या विहिरीत कोसळले. ही विहीर पाण्याचे तुडुंब भरलेली होती. या विहिरीला कोणतेही कठडे नव्हते, त्यामुळे पिकअप थेट पाण्यात गेल्याची प्राथमिक माहिती समारे आली आहे. या घटनेतील 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेतील मृतांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा देखील समावेश आहे. तसेच, या घटनेत 7 जण बचावले असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेवर बोलताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या अपघाताची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.






