। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील कर्जत चारफाटा ते भिसेगाव श्रद्धा हॉटेल या रस्त्याचे आरसीसी काँक्रीटीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने साडेचार कोटींचा निधी दिला आहे. त्या रस्त्याचे काम सुरु व्हावे यासाठी उपोषणे देखील करण्यात आली आणि तीन महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. दरम्यान, रस्त्याच्या आड येत असलेली अतिक्रमणे देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दूर केली आहेत, मात्र तीन महिन्याहून अधिक कालावधी लोटला तरी रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरु झालेले नाही आणि त्यामुळे गेली तीन महिन्यापासून बंद करण्यात आलेला हा रस्ता आणखी किती दिवस बंद राहणार असा प्रश्न स्थानिक उपस्थित करीत आहेत.
कर्जत शहरातील भिसेगाव गावात जाणारा आणि मुख्य म्हणजे राज्य सरकारच्या एसटी आगाराकडे जाणारा रस्ता गेली तीन महिन्याहून अधिक काळ बंद आहे. कर्जत नगरपरिषद कडून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी राज्य सरकारने साडे चार कोटींचा निधी दिल्यानंतर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन यावर्षीच्या पावसाळ्यात झाले. त्यानंतर संबंधीत कामाचा ठेका घेणार्या ठेकेदार कंपनीने भिसेगाव श्रद्धा हॉटेल ते कर्जत चार फाटा या साधारण 800 मीटर लांबीच्या रस्त्याचा डांबरी थर खोदून काढला. तेंव्हापासून हा रस्ता वाहतुकीस बंद असून मागील महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या आड येत असलेली अतिक्रमणे तोडून टाकली आहेत.
मात्र रस्ता खोदून अनेक महिने लोटले तरी भिसेगाव -कर्जत चारफटा रस्त्याचे काम काही सुरु झालेले नाही. त्याचा फटका या ठिकाणी व्यवसाय करणारे रिक्षा चालक आणि लहान व्यवसायिक यांना बसत आहे. त्यांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
आमच्या अनेक रिक्षाचालक यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ कर्जत नगरपरिषद प्रशासनाने आणली आहे.
साईनाथ श्रीखंडे, सामाजिक कार्यकर्ते.
चारफाटा-भिसेगाव रस्त्याचे काम बंदावस्थेत
