चौलमळा क्रिकेट लीग स्पर्धा; रिया टायगरचा विजेतेपदावर कब्जा

काव्या चॅलेंजरर्सला उपविजेतेपद

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चौलमळा क्रिकेट संघ आयोजित मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि. 7) एप्रिल दिमाखात पार पडली. या स्पर्धेचा अंतिम सामना संघमालक सचिन आमरे यांच्या रिया टायगर आणि संघमालक शैलेश नाईक यांच्या काव्या चॅलेंजरर्स या संघांदरम्यान झाला. रिया टायगरच्या साईप्रसाद पडवळची अष्टपैलू कामगिरी आणि अष्टपैलू खेळाडू तुषार पाटील याने विजयी फटका लगावत चौलमळा क्रिकेट लीग स्पर्धेच्या पहिल्या पर्वाच्या चषकावर नाव कोरले. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या साईप्रसादला सामनावीरासह मालिकावीराचा किताब देऊन गौरविण्यात आले.

चौलमळा क्रिकेट संघातील खेळाडूंच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच ही स्पर्धा चौल-पाझर येथील मैदानावर खेळविण्यात आली. गावातील तरुण पिढीमध्ये एकोपा व एकमेकांबद्दल जिव्हाळा राहावा, हीच या स्पर्धेमागची भावना होती. या स्पर्धेचे उद्घाटन चौलमळा गावप्रमुख रवींद्र घरत, कृष्णादेवी युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी चौल ग्रामपंचायतीचे सदस्य शशिकांत म्हात्रे, गावाचे उपप्रमुख जितेंद्र पाटील, खजिनदार अल्पेश घरत, सहसचिव योगेश जाधव, रवींद्र नाईक, वामन घरत, प्रभाकर नाईक, दत्तात्रय जाधव, सुनील घरत, विलास शिवलकर, भजन मंडळाचे अध्यक्ष तथा युवक मंडळ उपाध्यक्ष अल्पेश म्हात्रे, भजन मंडळ उपाध्यक्ष अंजेश घरत, अनंत म्हात्रे, अनिल नाईक, विनायक थळकर, रवींद्र पाटील, पांडुरंग पाटील, अनिता पाटील, जनार्दन नाईक, अशोक पाटील आदी प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा चौलमळा गावापुरती मर्यादित होती. स्पर्धेत सहा संघांचा समावेश होता.

आयपीएलच्या धर्तीवर प्रत्येक संघाची मालकी देण्यात आली होती. त्यात शैलेश नाईक संघमालक (काव्या चॅलेंजर्स), सुजित नाईक संघमालक (जित ट्रान्स्पोर्ट), मोहन घरत संघमालक (अलिबाग बीच कॅम्पिंग), सचिन आमरे संघमालक (रिया टायगर), मंदार नाईक संघमालक (श्री कृष्णादेवी प्रसन्न), सुनील घरत संघमालक (श्री माऊली केबल नेटवर्क) या संघांचा समावेश होता.

स्पर्धेतील अंतिम सामना रिया टायगर आणि काव्या चॅलेंजर्स यांच्यात झाला. तीन षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना काव्या चॅलेंजर्सने 27 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात रिया टायगरचे सलामीवीर साईप्रसाद पडवळ आणि अभिषेक घरत यांनी काव्या चॅलेंजर्सच्या गोलंदाजी फोडून काढत अवघ्या दोन षटकातच संघाला विजयाच्या जवळ नेले. दरम्यान, सलामीवीर अभिषेक बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या तुषार पाटील याने विजयी फटका लगावत रिया टायगरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विजेत्या रिया टायगरला 6666 रोख व चषक, तर उपविजेत्या काव्या चॅलेंजर्सला 4444 रोख व चषक तसेच तृतीय क्रमांक पटकावणार्‍या श्री माऊली केबळ नेटर्क संघाला 2222 रोख व चषक देऊन गावचे प्रमुख रवींद्र घरत, जितेंद्र घरत, युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज म्हणून साईप्रसाद पडवळ याला गौरविण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून दिपक लाड, प्रज्ञेश पाटील, राजेंद्र पाटील यांनी काम केले. समालोचक म्हणून शशिकांत म्हात्रे, सुशांत शिवलकर, योगेश जाधव यांनी, धावफलक मांडणीचे महत्त्वपूर्ण काम विजय सातांबेकर आणि सिद्धेश लोहार यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक चौलमळा क्रिकेट संघाचे अनिकेत म्हात्रे, जयेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकार्‍यांनी मेहनत घेतली.

खेळाडूंवर बक्षिसांची खैरात
मोहन घरत यांच्याकडून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे चषक, स्व. उदय मोरे यांच्या स्मरणार्थ साधना वामन घरत यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी, रवींद्र दत्तात्रेय नाईक द्वितीय क्रमांकासाठी, तर तृतीय क्रमांकासाठी स्व. प्रशांत लाड यांच्या स्मरणार्थ अस्मिता निलेश घरत यांच्याकडून रोख रकमेचे पारितोषिक देण्यात आले. अजित नाईक (कृष्णाई जनरल स्टोअर) सामनावीरांचे चषक, निलेश मोरे मालिकावीर चषक, शशिकांत म्हात्रे उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजासाठी चषक आणि मालिकावीरासाठी सायकल पारितोषिक देण्यात आली.
Exit mobile version