चौलनाका यंदाही खड्ड्यात

रस्त्याला तलावाचे स्वरुप; नागरिकांचे हा
| रेवदंडा | वार्ताहर |
अलिबाग-रेवदंडा या मुख्य रस्त्यावरील चौलनाका येथील रस्ता प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसात खड्ड्यात गेला आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून, पावसाच्या पाण्याने तुंडूब भरलेल्या रस्त्याला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या खड्डेमय रस्त्यातून मार्गक्रमण करणे नागरिकांना फारच जिकिरीचे ठरत आहे.
अलिबाग तालुक्यात चौल नाक्यावरील रस्त्याला दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ मोठ खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी व्यवस्थित निचरा होण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने रस्ता पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला जातो. या पाण्याने भरलेल्या रस्त्यावरुन खड्ड्यातून लहान-मोठी वाहनांना जा-ये करताना फारच कठीण बनते. त्यातच पाणी भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने येथून जाणारे मोटारसायकल, रिक्षा व सितारा या छोट्या वाहनांस अपघातास निमत्रंण म्हणावे लागेल. चौलनाक्याहून अलिबागकडे व चौल नाक्याहून रेवदंड्याकडे गेलेल्या दोन्ही मार्गात मोठे खड्डे पडले आहेत. ऐन पावसात हे खड्डे पाण्याने भरले जातात, परंतु, पाणी जायला मार्ग नसल्याने या रस्त्यावर पाण्याची मोठी डबकी तयार झाली आहेत.
चौलनाक्यामार्गे ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या वाढली आहे. खड्ड्यांची मोठी डबकी चुकविताना वाहन चालकाची तारांबळ उडत असून, नित्याने वाहतूक कोंडीच्या समस्येलासुद्धा सामोरे जावे लागते. चौल नाक्यावरील रस्त्यातील खड्ड्यांचे साम्राज्य गेली अनेक वर्षे आहे. परंतु, संबंधित या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. स्थानिक ग्रामस्थ याविरोधात संप्तत प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सद्यःस्थितीत अलिबाग-रेवदंडा रस्ता कधी नव्हे एवढा सुस्थितीत आहे, परंतु चौल नाक्यावर पडलेले खड्डे मात्र दुर्लक्षित केले जात आहेत. संबंधितांनी चौलनाक्यावरील या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी चौल ग्रामस्थांसह प्रवासीवर्ग करत आहेत.

Exit mobile version