सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
ऐन गणेशोत्सवात सार्वजनिक बांधकाम खात्याने चौलनाक्यावर केलेली मलमपट्टी थोड्याशाच पावसाने वाहून गेल्याने चौलनाक्यावरील रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेले चौल नाक्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य अद्यापि जैसे थेच आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अलिबाग व मुरूड तालुक्याला मध्यवर्ती ठिकाण असलेले चौलमधील चौल नाका हा नित्याने वाहतुकीचा आहे. मात्र, गेली अनेक वर्षे ऐन पावसात हा नाका खड्ड्यातच असतो. येथील रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे तलावाचे स्वरुप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. विशेष करुन सायलकस्वार आणि मोटारसायकल चालकांचे मोठे हाल होतात.
चौल नाक्यावरील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम खात्यास निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. यावर्षी मुरूड ते अलिबाग रस्ता नूतनीकरण, दुरूस्ती करण्यात आली. मात्र, चौल नाका दुर्लक्षितच ठेवण्यात आला. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता, या रस्त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी स्थानिक ग्रामस्थ व प्रवासीवर्गाने रास्ता रोकोसारखे आंदोलन छेडणे जरूरीचे आहे. तरच सार्वजनिक बांधकाम खाते व प्रशासनाचे लक्ष्य वेधले जाईल, अशी चर्चा सुरू आहे.