‘जल्लोष संगीताने’ चौलमळाकर मंत्रमुग्ध

विविध कार्यक्रमांनी कृष्णादेवीच्या उत्सवाची सांगता
। चौल । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावची ग्रामदेवता आई कृष्णादेवीचा उत्सव 2 मे रोजी उत्साहात पार पडला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी रोहित पाटील प्रस्तृत जल्लोष संगीताचा मराठी-हिंदी गाण्यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच मंत्रमुग्ध झाले.

आई कृष्णादेवीच्या उत्सवाचा सकाळी पालखी सोहळ्याने शुभारंभ झाला. ढोल-ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक मधुकर नाईक यांच्या घरापासून मंदिरापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा पार पडली. यावेळी तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी 7 वाजता कृष्णादेवी प्रासादिक भजन मंडळाचे भजन पार पडले. यावेळी बुवा चंद्रकांत नवगावकर यांना विकास पाटील आणि अजय वाडकर यांनी पखवाजाची साथ दिली. हा संपूर्ण कार्यक्रम भजन मंडळाचे अध्यक्ष संदीप प्रभाकर घरत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यानंतर चौलमळा गावचे रहिवासी वामन घरत यांना रायगड जिल्हा परिषदेचा रायगडभूषण, तर रवींद्र नाईक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना चौलमळा गावच्या वतीने गावचे प्रमुख सुनील घरत, नंदकुमार म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक, महिला मंडळ अध्यक्ष प्रमिता पाटील, भजन मंडळ अध्यक्ष संदीप घरत, चौल ग्रा.पं. सदस्य शशिकांत म्हात्रे, जितेंद्र पाटील, दिलीप म्हात्रे, सचिन गोंधळी, वंदेश लाड, खजिनदार अल्पेश घरत, सचिव राकेश लोहार, सहसचिव योगेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का नाईक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिषा लोहार, सेजल नाईक, समीक्षा म्हात्रे आदींनी सहकार्य केले.
रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनार्थ आयोजित जल्लोष संगीताचा ऑर्केस्ट्राने चौलमळाकरांना ठेका धरायला लावला. गायक रोहित पाटील यांच्या गाजलेल्या एकच राजा इथे जन्मला, खंदेरीचे माझ्या येताले देवा, रामदास निघाली.. आणि माझी माऊली गो.. आदी एकापेक्षा एक सरस गाण्यांनी प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली. रोहित पाटील यांच्या सोबतीने मराठी श्रीवल्ली फेम नवीन मोरे, भूमी काळभेरे, पूजा म्हात्रे यांनी विविध गाण्यांचे सादरीकरण करुन कार्यक्रमात नवनवीन रंग भरले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉमेडी किंग डी. महेश यांनी केले. तर, लावणीसम्राज्ञी दिव्या कदम यांच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले. कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशितून शेकडो लोक उपस्थित होते. शेवटी युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चौलमळा ग्रामस्थ, कृष्णादेवी युवक मंडळ, महिला मंडळ, चौलमळा मुंबईकर ग्रामस्थांसह युवक मंडळाच्या सभासदांनी मेहनत घेतली.

Exit mobile version