| भाकरवड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत पोयनाड हद्दीतील भाकरवड गावातील सिद्धीका पाटील सुहित जीवन ट्रस्ट, पेण, रायगड येथील बौद्धिक अक्षम (मतिमंद) विद्यार्थ्यांनी स्पेशल ऑलिम्पिक नॅशनल ॲथलेटिक्स गेम्समध्ये दैदीप्यमान यश मिळवून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. 5 व 6 फेब्रुवारी रोजी रोहतक, हरियाणा येथील स्पेशल ऑलिम्पिक भारत आयोजित नॅशनल ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या. या नॅशनल स्पर्धात 510 दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धामध्ये सुहित जीवन ट्रस्ट, पेण येथील विद्यार्थीनी सिद्धीकाने 100 मीटर धावणे यात रौप्यपदक तसेच जॅवलिंग थ्रो रौप्यपदक पटकावले. या उल्लेखनीय यशामागे, विद्यार्थ्यांचे पालक, संस्था तसेच क्रिडा प्रशिक्षक अमोल काईनकर व प्रीती म्हात्रे, डॉ. सुरेखा पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या या चमकदार कामगिरीमुळे समाजातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून संस्थेचा गौरव उंचावला आहे.







