सलग सहाव्या वर्षी दत्तटेकडीला परिक्रमा
| चौल | प्रतिनिधी |
‘दिगंबरा दिगंगरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… जगत् वंद्य अवधूत दिगंबर..’च्या जयघोषात चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरातून दत्तमहाराजांच्या पादुकांवर अभिषेक घालून दत्तगुरुंचे गुरव प्रभाकर आगलावे यांच्या हस्ते आरती करुन पालखी परिक्रमणेला गुरुवारी (दि. 27) दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पालखीवर होणारी फुलांची उधळण, ठिकठिकाणी सुवासिनींकडून करण्यात आलेले औक्षण, सोबत टाळ-मृदुंगाचा गजर अन् अव्याहतपणे सुरु असलेल्या दत्तनामाच्या गायनाने चौलनगरी दुमदुमून वातावरण भक्तीमय झाले होते.
वार्डे गुरुजी नवनाथ आरती मंडळ चौल यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांची प्रतिमा आणि पादुका पालखी परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. यावर्षीचे पालखी परिक्रमेचे हे सहावे वर्ष होते. या पालखी परिक्रमेत शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला यावेळी पायी प्रदक्षिणा घालण्यात आली.
दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष, पादुका आणि मूर्तीवर होणारी पुष्पवृष्टी, मंदिरात केलेली विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट आणि याची देही याची डोळा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर भाविकांची उसळलेली गर्दी यामुळे चौलनगरी भक्तीमय वातावरणात भारावून गेल्याचे चित्र दिसून आले. यावेळी सुवासिनींकडून दत्तगुरुंचे औक्षण करण्यात आले. दुपारी तीन वाजता पालखी मंदिरातून मार्गस्थ झाली. स्वामी समर्थ मंदिरमार्गे, पुढे सराई, सोमेश्वर मंदिर, हनुमानपाडा, गायचोळे अशी मार्गक्रमणा करीत भोवाळे येथून दत्तमंदिरात सायंकाळी सातच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले. दरम्यान, पहिल्या टप्प्यात सोमेश्वर मंदिरात पालखी विश्रांतीसाठी काही वेळ ठेवण्यात आली. दरम्यान, आरती घेण्यात आली. चहा, नाश्ता घेऊन पालखी मंदिराकडे मार्गस्थ झाली. जवळपास चार तासांच्या मार्गक्रमणानंतर पालखीचे दत्तमंदिरात प्रस्थान झाले. सायंकाळी सात वाजता महाआरती झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद देण्यात आला. प्रसादाच्या आस्वादाने भाविक कृतार्थ झाल्याचे पाहावयास मिळाले.
पालखी परिक्रमेदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे, चौल ग्रा.पं. माजी उपसरपंच अजित गुरव, नागाव सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच निखिल मयेकर, रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे, सचिन राऊळ, शेकापचे निलेश खोत, चौलमळा गावचे अध्यक्ष रवींद्र घरत, सागमळा गावचे अध्यक्ष राजेंद्र ठाकूर, तुलाडदेवी-गणपती मंदिर अध्यक्ष सुधाकर म्हात्रे, पाचकळशी समाज अध्यक्ष रमेश म्हात्रे, सिद्धेश शेणवईकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्तमंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आशिष वासुदेव, सचिन राऊत, अरुण टेकाळकर, संदीप नागावकर, निकेश घरत, राकेश नाईक, अनिकेत नाईक आणि वार्डे गुरुजी नवनाथ आरती मंडळ, चौलच्या सभासदांनी मेहनत घेतली. उत्तरोत्त या सोहळ्यास भाविकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून आले. हा सोहळा दरवर्षी अखंडितपणे सुरु राहणार आहे. दत्तभक्तांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा सोहळा यशस्वी पार पडला, असा विश्वास वार्डे गुरुजी नवनाथ आरती मंडळाच्या सभासदांनी व्यक्त केला.
सुवासिनींकडून औक्षण
दत्त पालखीचे ठिकठिकाणी सुवासिनींकडून औक्षण करण्यात आले. यावेळी पालखी मार्गात अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दत्तभक्तांनी पालखी परिक्रमेदरम्यान पालखीवर फुलांची उधळण केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दत्तमय झाल्याचे चित्र होते.
11 डिसेंबरला मंदिर प्रदक्षिणा
दत्तमंदिराला 108 प्रदक्षिणा घालण्याचा सोहळा गुरुवार, दि. 11 डिसेंबर रोजी होणार असल्याचे वार्डे गुरुजी नवनाथ आरती मंडळाच्यावतीने सांगण्यात आले असून, जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून तो यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी दत्तभक्त निकेश घरत 7666079953 यांच्याशी संपर्क साधावा.









