रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

भारतीय रेल्वेमध्ये कारकून या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 20 जणांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये समोर आला आहे. यात संबंधिताने तब्बल 1 कोटी 31 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणात पंडित पोवार याच्यासह इतर पाच जणांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी पंडित पोवार यांनी आपली रेल्वे प्रशासनात ओळख असल्याचे सांगत कारकून या पदावर नोकरी लावून देणार असल्याचे आमिष दाखून 20 जणांकडून तब्बल 1 कोटी 31 हजार रुपये घेतले. मात्र संबंधितांना नोकरी लावून न दिल्याने हा प्रकार समोर आला. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. महत्वाचे म्हणजे या फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून पंडित पोवार याने आपल्या कोल्हापूर येथील गावी आलिशान घराचे बांधकाम केल्याचे उघड झाले आहे. मागील दोन वर्षांपासून हा फसवणूकीचा प्रकार सुरु असून पैसे परत न केल्याने फसवणूक झालेल्या व्यक्तीने अखेर खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खारघर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

Exit mobile version