चित्ते आणि कबुतरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी शनिवारी मध्य प्रदेशातील जंगलात चित्ते सोडण्याचा कार्यक्रम झाला. मोदी हे जणू काही आयुष्यभर हाच ध्यास घेऊन होते आणि आता तो पूर्ण झाला अशी त्याची जाहिरातबाजी करण्यात आली. नेहमीप्रमाणे गेल्या पंच्याहत्तर वर्षात चित्ते भारतात पुन्हा आणण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत असा खोटा प्रचार मोदींनी आपल्या भाषणात केला. प्रत्यक्षात 1970 मध्ये इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा इराणमधून चित्ते आणण्यासाठी प्रयत्न केले होते हे सर्व वृत्तपत्रांनी छापलं आहे. त्यानंतर 2009 मध्ये काँग्रेसचे सरकार असताना जयराम रमेश यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना न्यायालयाने स्थगिती दिली नसती तर 2013 मध्येच हे चित्ते भारतात आले असते. न्यायालयाने 2020 मध्ये ही स्थगिती उठवली. त्यानंतरही मोदी सरकारला सर्व सिद्धता करण्यासाठी दोन वर्षे द्यावी लागली. शिवाय या प्रयोगाच्या सफलतेविषयी शंका आहेच. मुद्दा असा की, आजवरची सरकारे नादान होती व निर्णय काय ते आम्हीच घेतो हा मोदींचा आविर्भाव सत्तेत आठ वर्षे झाली तरीही काही बदलायला तयार नाही. कालच्याच दिवशी दुसर्‍या एका कार्यक्रमात बोलताना मोदी असे म्हणाले की, इतकी वर्षे आम्ही कबुतरे सोडत होतो आता चित्ते सोडत आहोत. एकेकाळी पंडित नेहरू हे हवेत कबुतरे सोडून शांततेचा संदेश देत होते. त्यावरची ही खास मोदी पद्धतीची टीका होती. एकेकाळी आम्ही दुर्बल होतो आणि आता चित्ते सोडून सामर्थ्य दाखवत आहोत असे मोदी यांना सुचवायचे असावे. केवळ मोदी यांच्या भक्तांनाच आवडू शकेल अशी ही बालिश तुलना आहे. अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुध्दामुळे आणि अण्वस्त्रांच्या स्पर्धेमुळे जगात कोणत्याही क्षणी तिसरे महायुध्द भडकू शकेल असे तेव्हाचे वातावरण होते. हरेक देशावर अमेरिका किंवा रशिया यांच्यापैकी कोणत्यातरी एका गटात सामील होण्याचा दबाव होता. त्यावेळी नेहरुंनी अलिप्ततेच्या धोरणाचा पुरस्कार केला व ते जगात यशस्वी करून दाखवले. अलिप्ततावादी राष्ट्रांचा एक दबावगट तेव्हा तयार झाला. त्या गटाचे प्रमुख नेते म्हणून नेहरू शांततेचा पुरस्कार करीत होते. त्यांना आईनस्टाईनपासून बर्ट्रांड रसेलपर्यंत अनेक थोर विद्वानांचा पाठिंबा होता. कबुतरे सोडणे हे या सर्वांचे प्रतीक होते. भारत हा गरीब व नवस्वतंत्र देश असूनही जगाच्या राजकारणात त्याच्या शब्दाला या सर्वांमुळे महत्व प्राप्त झाले होते. आजचा सामर्थ्यशील भारत हा त्या काळातील धोरणांच्या खांद्यावरच उभा आहे. केवळ कृतघ्न लोकच हा वारसा नाकारू शकतात. नेहरुंच्या धोरणांची समीक्षा वा टीका यापूर्वीही अनेकदा झाली आहे. पण नेहरु हे काहीतरी छचोर आणि कमी बुध्दीचे नेते होते असा प्रचार करणे हे हलक्या दर्जाचे आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात मोदी यांनी रशियामध्ये जाऊन पुतीन यांना सध्याचा काळ युध्दाचा नाही असा उपदेश केला. सर्व माध्यमांमध्ये त्यांचे मोठे मथळे झाले. एकीकडे आपण स्वतः अशी शांततेची कबुतरे उडवायची आणि दुसरीकडे नेहरुंच्या धोरणांची टिंगल करायची हा दुटप्पीपणा झाला. चित्ते आणणे व जंगलात सोडणे म्हणजे देश सामर्थ्यशाली झाल्याची निशाणी मानणे हेदेखील न्यूनगंडाचे लक्षण आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मोदी यांनी चीनशी आपली मैत्री झाल्याचा बराच गवगवा केला. प्रत्यक्षात चीनने आपल्याला लडाख व अरुणाचल प्रदेशात सातत्याने मागे रेटण्याचा प्रयत्न केला. अरुणाचलमध्ये सीमेलगत त्याने खेडी वसवण्याचा उद्योग केला आहे. लडाखमध्ये चीनने काही प्रदेशावर ताबा मिळवला आहे की काय याबाबतचा संशय अजूनही फिटलेला नाही. दुसरीकडे चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे वा चिनी कंपन्यांना शह देण्याचे आपले प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. चीन आपल्यावर कधीही कुरघोडी करू शकेल ही भीती कायम आहे. देश म्हणून आपली अर्थव्यवस्था विस्तारली असली तरी विषमताही भयंकर वाढली आहे. त्यामुळे मूठभर अदानी-अंबानी तेवढे सामर्थ्यशाली झाले आहेत. अशा स्थितीत चित्ते सोडण्यालाच पराक्रम मानणे हे भक्तांना सुखवणारे असेल, पण ते निरर्थक आहे.

Exit mobile version