| पनवेल । वार्ताहर ।
तळोजा औद्योगिक क्षेत्रातून सोडल्या जाणार्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे खारघर खाडीतील खारफुटीची झाडे सुकू लागली आहेत. हा प्रकार मानवनिर्मित प्रदूषणामुळे होत असल्यामुळे खारफुटीच्या संरक्षणाची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
रोडपालीपासून खारघर शहरालगत खाडीचा भाग आहे. या खाडीतील काही ठिकाणी खारफुटीच्या झाडांची कत्तल केल्यामुळे झाडे नष्ट झाली आहेत; तर काही ठिकाणी सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे झाडे नष्ट झालेली आहेत. त्यामुळे या रासायनिक कंपनीच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्रव्यवहार करून खारघरमध्ये जनजागृती रॅली काढली होती, पण अजूनही असे प्रकार सुरूच असल्याने खारघर खाडीतील खारफुटी केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात सुकू लागली आहे. त्यामुळे प्रदूषण महामंडळाने सांडपाणी सोडणार्या रासायनिक कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अॅड. नरेश ठाकूर यांनी प्रदूषण महामंडळाकडे केली आहे.
विशेष म्हणजे, याविषयी वन विभागातील कर्मचार्यांकडे विचारणा केली असता हा परिसर सिडको हद्दीत आहे. तसेच केमिकलयुक्त सांडपाणी रोखण्यासाठी प्रदूषण महामंडळाने प्रयत्न करावेत, असे उत्तर दिले जात असल्याने ही प्रशासकीय उदासीनता पर्यावरणाला घातक ठरत आहे.
खाडीकिनारी भराव घालून केमिकलयुक्त सांडपाणी रोखून धरल्यामुळे झाडांची हानी होत आहे. गेल्या वर्षी वन विभागाने पाहणी केली होती, पण काही ठोस कारवाई झाली नाही. तसेच हे प्रकार थांबवण्यासाठी सीसी टीव्ही लावणे आवश्यक आहे.
नरेश सिंग
पर्यावरणप्रेमी