घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल
| सोगाव | वार्ताहर |
बुधवारी (दि.19) मध्यरात्रीच्या सुमारास अलिबाग-पेण मार्गावर कार्लेखिंडीतील अवघड वळणावर आरसीएफ थळ कारखान्यातुन तुर्भे-मुंबईकडे रसायनाची वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघात झाल्यानंतर टँकरचालक पळून गेला. तर, क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताची बातमी मिळाल्यानंतर अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकरमधील रसायनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आरसीएफ येथील अग्निशमन दलाला पाचारण करत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, कार्लेखिंडीतील वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यात आलेली आहे..
अपघातग्रस्त टँकर सकाळी सव्वाअकरा वाजेपर्यंत काढण्यात आलेला नव्हता. परंतु, काहीवेळात क्रेनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत अधिक तपास अलिबाग पोलीस करत आहेत.