उरणच्या कांदळवनाला धोका; खाडीत सोडले रासायनिक सांडपाणी

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील भेंडखळ व पागोटे गावालगतच्या कांदळवन व खाडी परिसरात टँकरद्वारे रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. या प्रकारामुळे खाडी परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून, औद्योगिक सांडपाणी सोडणार्‍यांविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कांदळवन खाडी परिसरात टँकरद्वारे रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी सोडत असल्याच्या तक्रारी काही जागरूक नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केल्या होत्या. त्यामुळे मे महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी भेंडखळ परिसरात बामर लॉरी परिसरातील मे. कॉनेक्स टर्मिनल प्रा.लि.च्या मागील रस्त्यावर खाडीतील नाल्यामध्ये औद्योगिक सांडपाणी सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच पागोटे परिसरातील खाडी भागात, कांदळवन परिसरात टँकरद्वारे रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी सोडण्यात आले होते. याचदरम्यान पुन्हा खाडी परिसरात रसायनयुक्त सांडपाणी सोडण्यात आल्याच्या तक्रारी आल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी 27 जुलै रोजी प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी भेंडखळ गावच्या हद्दीतील मे. सेंट्रल वेअर हाऊसिंगच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यामध्ये आणि भेंडखळ गावालगत होल्डिंग पॉँडमध्ये रासायनिक सांडपाणी सोडल्याचे दिसून आले आहे.

खाडीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी संकलित केले होते. या तपासणी अहवालात त्यात रासायनिक द्रव्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे उरण पोलीस ठाण्यात जलप्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

विशालसिंग राजपूत, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ


Exit mobile version