…म्हणून ग्रामस्थ झाले आक्रमक;परिसरात ठेवला पोलीस बंदोबस्त

उत्तम कंपनीचे रासायनिक पाणी बाळगंगा नदीत सोडले;50 गावांच्या पिण्याचा प्रश्‍न
। खोपोली । वार्ताहर ।
खालापुर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायत हद्दीतील उत्तम स्टील कारखान्यातून उत्पादन प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे रासायनिक पाणी बाळगंगा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दूषित लालसर पाणी नाल्यातून बाळगंगा नदीत मिसळल्याने सारेपाणी लाल झाले आहे. या नदीच्या पाण्यावर पंधराहून अधिक ग्रामपंचायतींच्या पाणीयोजना असल्याने पन्नास गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐन पावसाळ्यात निर्माण झाला आहे. परिणामी, ग्रामस्थ आक्रमक झाल्याने याठिकाणी प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दुषित पाण्याचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याशिवाय अधिक तपास करण्यासाठी कोकण भवन येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी वर्गाला पाचारण करण्यात आले आहे.

याबाबत कंपनीला जाब विचारण्यासाठी तांबाटीचे सरपंच अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील जांभिवली सरपंच दिनेश घाडगे, नितीन कदम, राकेश लाड, मनसेचे महेश सोगे, आशिष कोंडे, अविनाश कदम, मोहन घाडगे, सुधीर दळवी, संतोष पाटील आदींनी तालुका प्रशासनाकडे तक्रार केली.

त्याची दखल घेत तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या आदेशाने वावोशीचे मंडळ अधिकारी तुषार कामत, तलाठी माधव कावरखे व कर्मचारीवर्गाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामे केले. तसेच तीन ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. याबाबत प्रदूषण मंडळाचे अधिकारी किल्लेदार यांना कळविण्यात आले आहे. याशिवाय अधिकारी अरविंद धपाटे यांनीही घटनास्थळी भेट दिली.दरम्यान,परिस्थिती चिघळू नये म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आ.जयंत पाटील यांच्या आरोपात तथ्य
रायगडातील सर्व नद्यांचे पाणी प्रदूषित झाल्याचा आरोप शेकाप आ.जयंत पाटील यांनी गुरुवारीच तारांकित प्रश्‍नाद्वारे विधानपरिषदेत केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नद्यांचे पाणी प्रदूषित असल्याची कबुली दिली होती. जे कारखाने प्रदूषण करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता उत्तम कंपनीबाबत सरकार काय कारवाई करणार, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

Exit mobile version