चेंढरे ग्रामस्थांचा भरपावसात पाण्यासाठी आक्रोश

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस पडून धरणे, तलाव पाण्याने तुडूंब भरून गेले आहेत. मात्र, भरपावसात अलिबाग तालुक्यातील चेंढरेमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे. गेली महिन्याभरापासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांच्या समस्यांकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी भरपावसात पाण्यासाठी आक्रोश केला. दत्ता ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळभाट स्थानक ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत हंडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ग्रामस्थ, महिला व तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होऊन ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

यावेळी हर्ष ढवळे, संदीप ढवळे, ॲड. परेश देशमुख, बी.एस. पाटील, अविनाश राणे, प्रकाश किनगे, प्रिया ढवळे, नागेश्वरी हेमाडे, सायली ढवळे, सुगंधा ढवळे, आरती तांबे, श्रीकांत गायकवाड, पंडीत ढमेढरे, सुरेश काकड, अतुल जाधव, सुधाकर भोसले, अशोक काकडे, तानाजी कदम, अविनाश राणे आदी ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळभाट, सुजलाम नगर, गुरव नगर, कृष्णदर्शन सोसायटी, संकुल सोसायटी, स्वामी समर्थ नगर या परिसरात सुमारे दोन हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून या परिसरातील घरात पाणीच पोहोचत नाही. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा करण्यात आली. मात्र, त्याची कार्यवाही ग्रामपंचायतीमधील प्रशासन विभागाकडून करण्यात आली नाही.

अखेर चेंढरेतील ग्रामस्थ व महिलांनी एकत्र येत मंगळवारी (दि.11) सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. महिलांनी डोक्यावर रिकामा हंडा घेत ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तीव्र निषेध व्यक्त केला. भरपावसात पाण्याची समस्या निर्माण होऊन त्याची कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

प्रशासन अधिकारी गायब
चेंढरे ग्रामस्थ पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची आगाऊ सूचना ग्रामपंचायतीच्या प्रशासन अधिकारी यांना दिली होती. मात्र, मंगळवारी निवेदन देण्यासाठी ग्रामस्थ कार्यालयात गेल्यावर निर्णयक्षम अधिकारी नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. काहीही करा आम्हाला पाणी द्या, अशी सक्त ताकीद दिली. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दत्ता ढवळे यांनी दिला.
पाण्याची यंत्रणा सक्षम करण्यास अपयशी
अलिबाग शहरालगत असलेल्या चेंढरे ग्रामपंचायतीचा विस्तार होत आहे. गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकीय राजवटीमार्फत चालविला जात आहे. मात्र ग्रामपंचायत हद्दीतील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. ग्रामपंचायतीच्या अधिकारात असताना विकास कामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे. चेंढरे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. नवीन घरे आणि वसाहती वाढत असताना पाणीपुरवठ्याची यंत्रणा सक्षम करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला.
ऐन पावसाळ्यात डोक्यावर हंडा
पाणी टंचाईमुळे चेंढरेमधील नागरिक त्रस्त झाले आहे. विशेष करून महिला वर्गात संताप निर्माण झाला आहे. पाणी ही मूलभूत गरज असूनही त्यासाठी नागरिकांना आंदोलन करावे लागत असेल तर ग्रामपंचायत प्रशासन नेमके काय करत आहे, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला. पावसाळ्यातही पाण्यासाठी हंडा घेऊन आंदोलन करण्याची वेळ आल्याची संतप्त भावना महिलांनी व्यक्त केली.
Exit mobile version