। उरण । वार्ताहर ।
पाणजे गावातील रहिवाशांवर भरपावसात पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावले आहे.महिन्यातून पंधरा दिवसा आड पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्याने घराच्या कौलारू पागणीचे पाणी पिण्याची नामुष्की रहिवाशांवर ओढवली आहे.जेएनपीटी व सिडको बाधित गावांवर भरपावसात पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गावातील रहिवाशांनी आपल्या जमिनी जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी संपादित करुन दिल्या आहेत.मात्र असे असतानाही या गावातील रहिवाशांना नागरी सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे. त्यात पंधरा दिवसा आड पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्याने भरपावसात ही गावातील 1500 रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.तरी पाणजे ग्रामपंचायत,उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,उरण तहसीलदार, जेएनपीटी बंदर प्रशासन, सिडकोचे अभियंता यांनी पाणजे गावातील रहिवाशांना भेडसावणारी पिण्याची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी पाणजे गावातील रहिवाशी विशेष करून महिला वर्ग करत आहेत.