| उरण | प्रतिनिधी |
उरणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, ऐन दिवाळीत या वीजपुरवठ्याच्या खेळखंडोब्याने नागरिकांच्या आनंदावरच विरजण पडले आहे. परंतु, वीजबिल मात्र अव्वाच्या सव्वा आकारले जात असल्याने महावितरणच्या कारभाराविरोधात जनतेच्या मनात संतापाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे दिवाळीचा सण उजळवायचा की महावितरणच्या अंधारात चाचपडत बसायचे? असा संतप्त सवाल आता उरणकर विचारू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच वीज गायब झाल्याने उरणकरांना वाढत्या उष्णतेच्या झळांसोबत अंधाराचाही सामना करावा लागत आहे. घराघरांत उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर वीजेवर अवलंबून असलेले व्यवसाय अक्षरशः ठप्प झाले आहेत. ग्राहकांची गर्दी असण्याच्या काळातच वीज गायब होत असल्याने व्यापारी, दुकानदार आणि लघुउद्योजकांचे आर्थिक नुकसान होत आहे. दिवाळीच्या धामधुमीत व्यवसाय करायचा की महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवायचे, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु, जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प बसून आहेत. दरम्यान, महावितरणला वीजबिल वसूल करताना ग्राहकांची आठवण होते; थकबाकी राहिली की वीजजोडणी तोडण्याची तत्परता दाखवली जाते. मात्र, ग्राहकांना नियमित वीजपुरवठा देण्याची वेळ आली की हीच तत्परता कुठल्या अंधारकोठडीत गायब होते? वीजपुरवठा खंडित होतो, उपकरणे बंद पडतात, व्यवसायाचे नुकसान होते; परंतु, बिलाचा आकडा मात्र कमी होत नाही. ग्राहकांनी पूर्ण बिल भरायचे आणि बदल्यात अंधार सहन करायचा. आता तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागे व्हावे, अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्थानिक वीज ग्राहकांमधून बालले जात आहे.






