रायगडमधून 225 शिक्षक नई तालीम यात्रेत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शिक्षक हक्काच संरक्षण, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी शिक्षक भारतीच्यावतीने नई तालीम यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला राज्यभरातून साधारपणे 4 हजार शिक्षकांनी सहभाग घेत मुंबईमध्ये दाखल झाले होते. या यात्रेला राज्य भरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रायगड जिल्ह्यातील 225 शिक्षकांनी या यात्रेमध्ये सहभाग नोंदविला.
महात्मा गांधीच्या पुतळ्याला अभिवादन करून नाना चौक ते मणिभवन अशी नई तालीम यात्रा काढण्यात आली. यावेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, राज्य प्रवक्ते सतिश हुले, जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील,उपाध्यक्ष दिपक दंत, महागांवकर, नाक्ती, तालुका अध्यक्ष तुरे, जिल्हा, तालुक्याचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. या यात्रेत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील 4 हजारहून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. तर, रायगड जिल्ह्यातील 225 शिक्षकांनी सहभाग घेत त्यांच्या प्रश्नांचा आवाज बनण्याचे काम केले.
या यात्रेच्या माध्यमातून, वस्ती शाळा शिक्षकांची पुर्वी सेवा सेवेत जोडण्यात यावी. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नये. जूनी पेन्शन योजना लागू करावी. टीईटी ची सक्ती रद्द करण्यात यावी. शिक्षकांना अशैक्षिक कामे देण्यात येऊ नयेत. मुख्यालयी राहण्याची अट शिथील करून 30 किलो मीटर परिघातील क्षेत्र मुख्यालय म्हणून ग्राह्य धरण्यात यावे. विस्थापीत शिक्षकांसाठी विशेष बदलीचा टप्पा राबविण्यात यावा. आंतरजिल्हा बदलीचा टप्पा सुरू करण्यात यावा. पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या मागण्यांसाठी त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांची भेट घेतली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसह प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वस्तीशाळा, शिक्षकांची जूनी सेवा जोडण्यासह इतर प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी संबंधित विभागाची बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सचिन अहिर यांनी दिले.






