चेन्नईची बेंगळुरवर मात

| बेंगळुरू| वृत्तसंस्था |

आयपीएल 2023च्या 24 व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा चेन्नई सुपर किंग्जने 8 धावांनी पराभव केला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईने स्फोटक फलंदाजी करत 20 षटकात 226 धावांचा डोंगर उभा केला. उत्तरादाखल आरसीबीची सुरुवात खराब झाली. कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी शतकी भागिदारी करत संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले होते. मात्र अखेर चेन्नईने बाजी मारली. विजयासाठी विशाल लक्ष समोर असताना आरसीबीने सुरुवातीलाच दोन गडी गमावले होते. असे असताना देखील चेन्नईने गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणामध्ये मोठ्या चुका केल्या ज्याचा फटका त्यांना बसला. अर्थात सीएसकेकडून काही चांगली फिल्डिंग देखील पहायला मिळाली. यात अजिंक्य रहाणेने सीमे रेषेवर एक षटकार वाचवला.

बेंगळुरूची फलंदाजी सुरू असताना चेन्नईकडून आठवे षटक रविंद्र जडेजाने टाकले. या षटकामध्ये ग्लेन मॅक्सवेलने दमदार खेळी केली. चौथ्या चेंडूवर त्याने षटकार मारण्यासाठी मोठा दणका मारला.  चेंडू उंच सीमारेषेबाहेर जात होता. पण  अजिंक्यने हवेत उडी मारली आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाऊ दिला नाही. अजिंक्यमुळे चेन्नईने 4 धावा वाचवल्या. अजिंक्यने अखेरपर्यंत चेंडूवरून नजर हटवली नाही आणि अगदी अचूक क्षणी हवेत उडी मारून षटकार रोखला. अजिंक्यने वाचवलेल्या या 4 धावा चेन्नईला विजयासाठी उपयोगी ठरल्या, कारण सीएसकेने ही लढत फक्त 8 धावांनी जिंकली.

अजिंक्यने फक्त क्षेत्ररक्षणामध्ये नाही तर फलंदाजीत कमाल दाखवली. तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या अजिंक्यने 20 चेंडूत 37 धावा केल्या, यात 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. याआधी त्याने 15 चेंडूत अर्धशतकी खेळी करत मुंबई इंडियन्सचा समाचार घेतला होता. सामन्यात चेन्नईकडून कॉन्वेने 45 चेंडूत 83 धावा केल्या, यात 6 चौकार आणि षटकारांचा समावेश होता. तर शिवम दुबेने 27 चेंडूत वादली 52 धावांची खेळी केली. आरसीबीकडून कर्णधार डु प्लेसिसने 33 चेंडूत 62 तर मॅक्सवेलने 36 चेंडूत 76 धावा केल्या.

Exit mobile version