चेन्नई ठरला ‘सुपर किंग’


कोलकातावर 27 धावांनी मात
आयपीएलच्या 14 हंगामाचे मानकरी

। दुबई । वार्ताहर ।

फॅफ डयूप्लेसिसच्या (86) उत्कृष्ट फलंदाजीनंतर मुंबईकर शार्दूल ठाकूरने (3/38) केलेल्या भेदक मार्‍यामुळे चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला 27 धावांनी धूळ चारत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या 14व्या हंगामाचे जेतेपद पटकावले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या चेन्नईचे हे चौथे ‘आयपीएल’ जेतेपद ठरले.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला 20 षटकांत 9 बाद 165 धावाच करता आल्या. दोन वेळा विजेत्या कोलकाताची ‘आयपीएल’चा अंतिम सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ होती. यंदा उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या वेंकटेश अय्यर (50) आणि शुभमन गिल (51) या युवा सलामीवीरांनी आक्रमक शैलीत फलंदाजी केली. परंतु शार्दूलने सलग दोन चेंडूंत अय्यर आणि नितीश राणा यांना बाद केले. तसेच दीपक चहरने गिलला पायचीत केले. त्यामुळे बिनबाद 91 अशा धडाकेबाज प्रारंभानंतर कोलकाताने 24 धावांत आठ बळी गमावले आणि त्यांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.
तत्पूर्वी, ‘एलिमिनेटर’ आणि ‘क्वालिफायर-2’च्या सामन्यात धावांचा यशस्वीरीत्या पाठलाग करणार्‍या कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारल्यावर चेन्नईने 20 षटकांत 3 बाद 192 अशी धावसंख्या उभारली. फॅफ (86) आणि ऋतुराज गायकवाड (32) यांनी चेन्नईला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्यांनी आठ षटकांत 61 धावांची भागीदारी रचल्यावर फिरकीपटू सुनील नरिनने ऋतुराजला माघारी पाठवले. मग फॅफला रॉबिन उथप्पाची (31) उत्तम साथ लाभली. उथप्पाने शाकिब अल हसन, वरुण चक्रवर्ती आणि नरिन या फिरकी त्रिकुटाच्या गोलंदाजीवर प्रत्येकी एक षटकार मारला. मात्र, नरिनच्या गोलंदाजीवर ‘रीव्हर्स स्वीप’ मारण्याच्या नादात तो पायचीत झाला. फॅफ आणि मोईन अली (नाबाद 37) यांनी अखेरच्या पाच षटकांत फटकेबाजी करत 61 धावा काढल्याने चेन्नईने 190 धावांचा टप्पा ओलांडला. फॅफने 59 चेंडूत 86 धावांची खेळी करताना सात चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी केली.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कोलकाताविरुद्धच्या अंतिम सामन्यात अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून धोनीचा हा 300वा सामना होता आणि ही कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील पहिलाच खेळाडू ठरला. धोनीने चेन्नईचे 214 सामन्यांत नेतृत्व केले असून त्याने एका ‘आयपीएल’ हंगामाच्या 14 सामन्यांत रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे कर्णधारपद भूषवले होते. तसेच त्याने भारताचा कर्णधार म्हणून 72 सामने खेळले. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 साली झालेला पहिलावहिला ट्वेन्टी-20 विश्‍वचषक जिंकला होता.

Exit mobile version