चेन्नईची ‘यशस्वी’ धुलाई

। अबूधाबी । वृत्तसंस्था ।
राजस्थान रॉयल्सने युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनी चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करीत राजस्थानला रॉयल विजय मिळवून दिला. त्यांनी केलेल्या ताबडतोब फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जने दिलेले 190 धावांचे आव्हान 7 विकेट आणि 15 चेंडू राखून पार केले. या विजयासह राजस्थानने स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 32 चेंडूत 77 धावा केल्या. लुईसच्या रुपात शार्दुल ठाकूरने चेन्नई सुपर किंग्जला पहिले यश मिळवून दिले. त्याने 12 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 27 धावांचे योगदान दिले. दुसर्‍या बाजूला यशस्वी जयस्वालने 21 चेंडूत 50 धावांची खेळी केली. दोन्ही सलामीवीर आपले काम फत्ते करुन परतल्यानंतर संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी तिसर्‍या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. संजू 24 चेंडूत 28 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर शिवम दुबेने ग्ले फिलिफ्सच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. दुबेनं 42 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 64 धावांची खेळी साकारली. दुसर्‍या बाजूला ग्लेन फिलिप्स 8 चेंडूत 14 धावांवर नाबाद राहिला.

Exit mobile version