222 धावांचा डोंगर सहज पार केला; विजयात शुभम दुबेचा मोलाचा वाटा
| नवीन चंदीगड | वृत्तसंस्था |
पंजाब किंग्सची इंडियन प्रीमिअर लीगमधील अपराजित मालिका अखेर खंडित झाली आहे. यंदाच्या हंगामात पहिल्या 7 सामन्यांत एकही पराभव न पत्करलेल्या पंजाब किंग्जचा अश्वमेध अखेर राजस्थान रॉयल्सने रोखून धरला. त्यामुळे पंजाबला या हंगामातील आपल्या पहिल्यावहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत पंजाबने 222 धावांचा डोंगर राजस्थान समोर रचला होता. मात्र, राजस्थानच्या फलंदाजाच्या फटकेबाजीपुढे पंजाबने उभारलेला धावांचा डोंगरही थोटा पडला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, पंजाब किंग्जने आपल्या 20 षटकांत चार गडी गमावून 222 धावांची एकूण धावसंख्या उभारली. प्रभसिमरन सिंगने उत्कृष्ट फलंदाजी करत 44 चेंडूंत 59 धावा केल्या; त्याच्या या खेळीत सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यरने 30 धावांचे योगदान दिले, तर प्रियांश आर्यने 29 धावा केल्या. दरम्यान, मार्कस स्टॉइनिस केवळ 22 चेंडू खेळत 62 धावांवर नाबाद राहिला. स्टॉइनिसच्या या खेळीत 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याने शेवटच्या 3 षटकांत 55 धावा चोपल्या आणि त्यामुळे पंजाब 4 बाद 222 धावांपर्यंत पोहोचले.
त्यानंतर लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या वैभव सुर्यवंशीने हल्लाबोल केला. त्याने 16 चेंडूंत 43 धावा ठोकल्या. तसेच, यशस्वी जैस्वालसह 20 चेंडूंत 51 धावा जोडल्या. दरम्यान, राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देण्यात यशस्वी जयस्वाल आणि डोनोव्हन फेरेरा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी राजस्थानने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 84 धावा केल्या ज्या आयपीएलच्या पहिल्या सहा षटकांतील पंजाबविरुद्धच्या दुसऱ्या सर्वोत्तम धावा ठरल्या. त्यानंतर ध्रुव 16 धावांवर बाद झाला. यशस्वीने या पर्वातील तिसरे अर्धशतक पूर्ण केले आणि 51 धावांवर बाद झाला. रियान परागही 29 धावा करून बाद झाला. डोनोव्हन फरेरा याने अवघ्या 26 चेंडूंमध्ये 52 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. यावेळी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शुभम दुबेने 12 चेंडूंमध्ये 31 धावांची नाबाद खेळी केली. फरेरा आणि शुभम यांनी पाचव्या गडीसाठी 32 चेंडूंमध्ये 77 धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि राजस्थानसाठी विजय खेचून आणला. यावेळी राजस्थान रॉयल्सने 19.2 षटकांत 4 गडी गमावत 228 धावा करत विजय साकारला. यावेळी पंजाबकडून यझुवेंद्र चहल याने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर अर्शदिप सिंहने 1 बळी घेतला.
विदर्भाचा पठ्ठ्या चमकला
या सामन्यातील राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या खेळाडूंमध्ये 31 वर्षीय शुभम दुबेचाही मोठा वाटा आहे. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शुभम जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा राजस्थानसमोर 36 चेंडूत 72 धावा करण्याचे मोठे लक्ष्य होते. मात्र, शुभमने 12 चेंडूतच 31 धावा फटकावल्या. त्याने डनोवन फरेरासोबत 32 चेंडूत 77 धावांची भागीदारी करत संघाला विजयापर्यंत पोहचवले. याच शुभमचा जन्म महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. एकदा क्रिकेट खेळताना त्याच्या शारीरीक शिक्षणाच्या शिक्षकांनी त्याला पाहिले आणि तिथूनच त्याच्या क्रिकेटच्या खऱ्याखुऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. त्याचे वडील पान टपरी चालवायचे आणि एका खासगी कंपनीत काम करायचे. आई गृहिणी होती. दरम्यान, त्याच्या काकाच्या मित्राने शुभमला क्रिकेटचे साहित्य घेण्यासाठी मदत केली. तो विदर्भाच्या राज्य संघात येण्यासाठीही प्रयत्न करत राहिला. मात्र, अनेक वर्षे त्याला प्रतिक्षाच करावी लागली. तो मुंबईत टाइम्स शिल्ड स्पर्धाही खेळला. मात्र, एकदा विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली आणि त्याला राज्याच्या संघात राखीव खेळाडूंमध्ये जागा मिळाली. त्यानंतर त्याचा हा प्रवास आपीएलपर्यंत पोहोचला.







