। माथेरान । प्रतिनिधी ।
माथेरान पर्यटनस्थळावर मलनिस्सारण महत्वाकांक्षी प्रकल्प मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामात बहुतेक ठिकाणी त्रुटी दाखवून कामास विलंब होत असल्याने काही लोकप्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामाच्या दर्जाबाबत आक्षेप घेतला आहे. त्यामुळे हे होणारे महत्वपूर्ण काम लवकरच मार्गी लागून समस्त माथेरान करांच्या मलनिस्सारण बाबतीत अडचणी दूर व्हाव्यात यासाठी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी या कामाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक केतन रामाणे, सोहेल महापुळे, निखिल शिंदे,मलनिस्सारण प्रकल्पाचे सब ठेकेदार प्रशांत गाडे, शुभम तिडके आदी उपस्थित होते. चौधरी यांनी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन संबंधित सब ठेकेदार त्याचप्रमाणे कामगार वर्गाला यापुढे कामाचा दर्जा आणि संपूर्ण कामे उत्तम प्रकारे पूर्ण करावीत,कामात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही अशा सूचना दिल्या आहेत.







