| मुंबई | प्रतिनिधी |
हस्तलिखित दस्तऐवजांच्या स्वरूपात असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने डिजिटल नोंदणीचा उपक्रम सुरू केला आहे. या नोंदणीसाठी हर घर दस्तक ही विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या हस्तलिखित दस्तऐवजांच्या ऑनलाईन नोंदीतून सांस्कृतिक वारसा जगासमोर आणावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.
पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहात याबाबत आयोजित बैठकीत मंत्री ॲड. शेलार बोलत होते. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, संचालक विभीषण चवरे, उपसचिव सामंत आदी उपस्थित होते. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, राज्यातील सर्व ग्रामसभेत हस्तलिखित नोंदणीचा विषय प्राधान्याने मांडण्याचे निर्देशही मंत्री ॲड. शेलार यांनी देत गावपातळीवरील हस्तलिखित स्वरूपातील स्थानिक वारसा जतन करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले.
स्थानिक पातळीवर हस्तलिखित दस्तऐवज उपलब्ध असलेल्या विविध संस्था, ऐतिहासिक घराणी, नागरिक, संघटना आणि कुटुंबे यांची पुढील सात दिवसात जिल्हा व तालुकास्तरीय सविस्तर यादी तयार करावी. यादी तयार झाल्यानंतर संबंधितांशी संपर्क साधून त्यांच्याकडील दस्तऐवजांची माहिती घेत ज्ञानभारतीवर त्यांची नोंदणी करावी. या नोंदणी प्रक्रियेत दस्तऐवजांची मूळ मालकी संबंधित संस्था, घराणी किंवा नागरिकांकडेच कायम राहील. केवळ दस्तऐवजांचे जतन करणे हाच या उपक्रमाचा मूळ हेतू आहे, असेही मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्राकडे हस्तलिखितांच्या स्वरूपात असलेला इतिहास हा अमूल्य आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याकडील ऐतिहासिक दस्तऐवज जागतिक स्तरावर नेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. हा केंद्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम असून यामध्ये सर्वांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.





