आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा निर्णायक टप्प्यात

भारताची आशा डी गुकेशवर

। टोरंटो । वृत्तसंस्था ।

आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. भारताचे आशास्थान असलेला 17 वर्षीय डी. गुकेश सामन्यातील अडथळा कसा पार करतो, यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या सातव्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या फिरोउझा अलिझेराविरुद्ध गुकेशचे पारडे जड असेल, असे सांगण्यात येत आहे. गुकेशने या स्पर्धेत लक्षवेधक खेळ करत 7.5 गुणांसह संयुक्तपणे आघाडी मिळवली. त्याच्यासह हिकारू नाकामुरा आणि रशियाचा इयान नेपोम्नियाची आघाडीवर आहे. त्यामुळे स्पर्धेतील उरलेले दोन सामने या तिघांसाठी मोलाचे आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुकेशसह संयुक्तपणे आघाडीवर असलेल्या नाकामुरा आणि इयान नेपोम्नियाची यांच्यात सामना होणार आहे. नाकामुराचा फॉर्म चांगला आहे. त्याने गेल्या सलग तीन सामन्यांत विजय मिळवलेले आहेत, तर इयान नेपोम्नियाची हा स्पर्धेतला एकमेव खेळाडू अपराजित आहे. गुकेशला अंतिम फेरीत नाकामुराशी सामना करावा लागणार आहे. गुकेश, इयान नेपोम्नियाची आणि नाकामुरा प्रत्येकी 7.5 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर असले तरी त्यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पाठी असलेल्या फॅबिआनो कॅरुआना यालाही विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. त्याचा सामना उद्याच्या फेरीत भारताच्या प्रज्ञानंदशी होणार आहे. त्यामुळे ही लढत त्याच्यासाठी सोपी नसेल, असे बुद्धिबळ तज्ज्ञ सांगत आहेत.

प्रज्ञानंदने या स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती; परंतु नंतर तो सातत्यात कमी पडला. सध्या तो सहाव्या क्रमांवर आहे. शनिवारच्या विश्रांतीमुळे नव्या उमेदीने सामन्यास सामोरे जाईल. भारताचा आणखी एक खेळाडू विदित गुजराथीनेही स्पर्धेत चमक दाखवली होती. त्याने नाकामुराविरुद्ध विजय मिळवले होते. त्याचा सामना अबासोवविरुद्ध होणार आहे. महिलांमध्ये झोंगी टॅन आणि तिंगजीई लेई यांच्यात विजेतेपदासाठी प्रमुख चुरस असेल. दोघींमध्ये अर्ध्या गुणाचे अंतर आहे.

Exit mobile version